पालघरच्या विद्यार्थ्यांना उपग्रहनिर्मितीत सहभागी होण्याची मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:12 AM2020-11-27T00:12:50+5:302020-11-27T00:13:00+5:30

या उपक्रमात दहा विद्यार्थ्यांचा एक गट एक उपग्रह स्वतः बनविणार आहे. त्याकरिता सहा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग २ ते ७ जानेवारी काळात घेतले जातील.

Palghar students will have the opportunity to participate in satellite manufacturing | पालघरच्या विद्यार्थ्यांना उपग्रहनिर्मितीत सहभागी होण्याची मिळणार संधी

पालघरच्या विद्यार्थ्यांना उपग्रहनिर्मितीत सहभागी होण्याची मिळणार संधी

Next

बोर्डी : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांनी बनविलेले शंभर उपग्रह एकाच वेळी अवकाशात प्रक्षेपित केले जाणार आहेत. देशात प्रथमच हा उपक्रम राबविला जात आहे. याकरिता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

या उपक्रमात दहा विद्यार्थ्यांचा एक गट एक उपग्रह स्वतः बनविणार आहे. त्याकरिता सहा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग २ ते ७ जानेवारी काळात घेतले जातील. तर चेन्नई येथे एकदिवसीय सातवा प्रशिक्षण वर्ग घेऊन प्रत्यक्ष उपग्रह बनविला जाणार असून त्यासाठी विद्यार्थ्याला तेथे स्वखर्चाने जावे लागणार आहे. १८ ते २२ जानेवारीदरम्यान बॅचप्रमाणे एकदिवसीय प्रशिक्षण चेन्नई येथे दिले जाईल. विद्यार्थ्यांकडून त्यांचा उपग्रह प्रत्यक्ष बनवून टेस्ट करून घेतला जाईल. ७ फेब्रुवारी रोजी डी.आर.डी.ओ.चे चेअरमन उपस्थित राहून रामेश्वरम् येथून हेलियम बलूनमार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. या आगळ्यावेगळ्या अशा उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये केली जाणार आहे. या फाउंडेशनचे महाराष्ट्रातील पदाधिकारी हे स्वतः विद्यार्थ्यांसोबत असतील, अशी माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनकडून देण्यात आली आहे.

हा उपक्रम भारतात प्रथमच राबविला जात असून महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी उपक्रमात सहभागी होणार आहेत. पालघर जिल्ह्यातूनही विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे.
- शाहू संभाजी भारती, 
कोअर कमिटी सदस्य, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल 
फाउंडेशन, महाराष्ट्र.

 

Web Title: Palghar students will have the opportunity to participate in satellite manufacturing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.