पालघरात तणाव
By Admin | Published: November 4, 2015 12:25 AM2015-11-04T00:25:54+5:302015-11-04T00:25:54+5:30
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील १३४ लिपीक टंकलेखक पदाच्या परिक्षेचा पेपर दोन वेळा फुटल्याने या परिक्षा रद्द करून या प्रकरणाची सीआयडी, सीबीआय चौकशी
पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील १३४ लिपीक टंकलेखक पदाच्या परिक्षेचा पेपर दोन वेळा फुटल्याने या परिक्षा रद्द करून या प्रकरणाची सीआयडी, सीबीआय चौकशी करावी व यातील दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरूवात झाली आहे. मात्र, या कॉपीप्रकरणामुळे वातावरण चिघळले असतांना उत्तीर्ण झालेले बहुतांशी परजिल्ह्यातील उमेदवार उद्या बुधवारी कागदपत्रासह उपस्थित राहणार असल्याने स्थानिक तरूणामधून संतप्त प्रतिक्रीया उमटत असून वातावरण तणावपूर्ण होत आहे.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक टंकलेखक पदाच्या १३४ जागासाठी ४ आॅक्टोबर रोजी झालेल्या परिक्षेमध्ये मोबाईलद्वारे उत्तराची देवाणघेवाण झाल्याने ही परिक्षा रद्द करून पुन्हा नव्याने १८ आॅक्टोबर रोजी परिक्षा घेण्यास आली होती. यावेळीही परिक्षा केंद्रात मोबाईलचा वापर झाल्याने पुन्हा जालना येथील दोन परिक्षार्थींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या परिक्षेमध्ये परजिल्ह्णातून आलेल्या परिक्षार्थीेंकडून मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचे प्रकार घडल्याची शक्यता पाहता ही परिक्षा रद्द करावी या मागणीसाठी सिद्धार्थ सांबरे, अमोल सांबरे, सचिन भोईर हे स्थानिक तरूण आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत.
पालघर जिल्हा घोषीत झाल्यानंतर नोकरी भरती मध्ये स्थानिक तरूणांना प्राधान्याने नोकरीत सामावुन घेतले जाईल असे सांगितले जात असताना या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या पैकी १३४ जागासाठी प्रथमत: बुधवारी आपल्या सर्टीफिकेटवर व इतर कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या २६६ विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी उत्तीर्ण हे परजिल्ह्णातील असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या पेपरफुटीप्रकरणातून परराज्यातील विद्यार्थ्यांना लाखो रू. घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका परिक्षा अगोदर पुरविण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे.
- उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात जे उमेदवार उत्तीर्ण झालेत अशा २६६ परिक्षार्थींना परिक्षार्थींना प्रमाणपत्रासह उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अशावेळी स्थानिक उमेदवार परिक्षार्थींच्या न्याय हक्कासाठी वाडा येथील तरूण साखळी उपोषणाला बसले असताना उद्याच सकाळी १० वा. हे उत्तीर्ण परजिल्ह्णातील परिक्षार्थीही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होणार असल्याने स्थानिक तरूणामधून संतप्त भावना उमटत आहेत.