पालघरची प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:57 AM2020-08-16T00:57:53+5:302020-08-16T00:58:03+5:30
शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
पालघर : जिल्हा प्रशासनाने विविध विकासकामांमध्ये आघाडी घेतली असून सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू आहे. आज पालघर जिल्ह्यात जी विकासकामे सुरू आहेत, ती पाहता लवकरच आपला जिल्हा राज्यात प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल यात शंका नाही. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पालघर जिल्ह्याला असलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पालघर ग्रामीण भागातील कोविडसंदर्भात असलेल्या सोयी-सुविधांचा उल्लेख करून आरोग्य विभागासोबतच काम करत असलेले महसूल विभाग, पोलीस दल, जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर यांचे महत्त्वाचे योगदान असून आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनामध्ये जे कर्मचारी शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना शासनातर्फे सहाय्य दिले जाईल, अशी ग्वाही या वेळी पालकमंत्र्यांनी दिली.
जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्सच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे आज कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यात यश आले आहे. शासनाने आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी विशेष मदत मिळण्यासाठी खावटी योजना मंजूर केली असून त्याचा जिल्ह्यामधील नागरिकांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी पोलीस प्रशासनात प्रशंसनीय कामगिरी केलेल्या पोनि. रवींद्र नाईक, हवालदार कुंदन तरे, महिला शिपाई शीतल तरे आदी अधिकारी-कर्मचारी तसेच वाडा येथील प्रांताधिकारी अर्चना कदम, तलासरी तहसीलदार डॉ.स्वाती घोंगडे, पालघर मंडळ अधिकारी मनोहर वसावे, अव्वल कारकून संतोष गवते, लिपिक विठ्ठल गुसिंगे, यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच कोरोनामध्ये शहीद झालेल्या पोलीस पत्नीला पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमधून धनादेश सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे डहाणू येथील एमआरएचआरयू या लॅबचे तसेच रिव्हेरा येथे ५० आय.सी.यू. बेड व ४० व्हेंटिलेटर असलेले डी.सी.एच. सेंटरचे ई-उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे आणि डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तयार झालेले ‘होम आयसोलेशन’ या पुस्तकाचे अनावरण या वेळी करण्यात आले. या वेळी जि.प.अध्यक्ष भारती कामडी, खा.राजेंद्र गावित, आ. श्रीनिवास वनगा, आ. विनोद निकोले, जि.प. उपाध्यक्ष नीलेश सांबरे, नगराध्यक्षा उज्ज्वला काळे, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, अति.मु.का. चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.