पालघरमध्ये आता होणार पंचरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:22 AM2018-05-15T03:22:54+5:302018-05-15T03:22:54+5:30
या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात अंतिमत: ७ उमेदवार उरले आहेत. ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने ७ रिंगणात आहेत.
पालघर : या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात अंतिमत: ७ उमेदवार उरले आहेत. ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने ७ रिंगणात आहेत.
राजेश रघुनाथ पाटील (अपक्ष), वसंत नवशा भसरा (अपक्ष) यांनी माघार घेतली. माघारीची मुदत संपल्यानंतर किरण गहला (मार्क्सवादी), राजेंद्र गावित (भाजपा), दामोदर शिंगडा (काँग्रेस), श्रीनिवास वनगा (शिवसेना), बळीराम जाधव (बविआ), शंकर बदादे (मार्क्ससीस्ट-लेनीनीस्ट पार्टी), संदीप जाधव (अपक्ष) हे रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी जरी हे ७ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ५ प्रमुख पक्षांच्या उमेदवारांतच होणार आहे. बदादे आणि जाधव हे तसे नॉनसिरीअस कॅन्डिडेट म्हणूनच राहणार आहेत. परंतु पंचरंगी लढत असल्याने उमेदवारांतील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. मार्क्सवादी उमेदवार किती मते खातो व कुणाची खातो यावर जय पराजय असेल. श्रमजीवी संघटनेने आपला पाठिंबा अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. त्यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. या लढतीत बळीराम जाधव आणि दामू शिंगडा हे दोन माजी खासदार, राजेंद्र गावीत हे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांना श्रीनिवास वनगा या नवख्या उमेदवाराने आव्हान दिले आहे. त्यामुळे ही लढत अधिक लक्षणीय ठरणार आहे. राष्टÑवादीने काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.
>पालघर सोडा आणि कडेगाव, पलूसमध्ये पाठिंबा घ्या अशी भूमिका भाजपाने घेतली होती व तसा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. तर शिवसेनेने पालघर सोडा आणि गोंदिया, भंडारामध्ये शिवसेनेचा पाठिंबा घ्या असा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. परंतु काँग्रेसने आपले उमेदवार दामू शिंगडा यांना रिंगणात कायम ठेवून हे प्रस्ताव फेटाळून लावल्याचे स्पष्ट केले आहे.