पालघर जि.प. निवडणुकीत महाविकास आघाडी शक्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:40 PM2019-12-17T22:40:50+5:302019-12-17T22:41:44+5:30

आघाडीतील घटक पक्षांचे सूतोवाच : जिल्ह्यातही भाजपला रोखण्याची तयारी

Palghar ZP Can elections with maha vikas aghadi? | पालघर जि.प. निवडणुकीत महाविकास आघाडी शक्य?

पालघर जि.प. निवडणुकीत महाविकास आघाडी शक्य?

Next

हुसेन मेमन।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : राज्यात भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांची महाविकास आघाडी तयार होऊन सरकार स्थापनही झाले. आता पालघर जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वच पक्ष सामोरे जाणार असून अशा वेळी पालघर जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकांतही महाविकास आघाडी होऊ शकते का, याबाबत चर्चा सुरू आहे. तसे सूतोवाचही या पक्षांकडून करण्यात येत आहे, मात्र तसा कोणताही अधिकृत आदेश जरी वरिष्ठांकडून मिळाला नसला तरीही तो लवकरच मिळू शकतो, या शक्यतेने आघाडी झाल्यास काय आणि कसे लढता येईल, याचीही चाचपणी आघाडीतील या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू झाली आहे. जिल्ह्यात महाआघाडीतील बविआ आणि सीपीएम या दोन पक्षांचाही विचार अशा वेळी करावा लागणार असल्याने यापूर्वीची महाआघाडी कायम राहील की महाविकास आघाडी तयार होईल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.


पालघर जिल्ह्यात विधानसभेतील मोठा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीकडे पाहिले जाते. अशा वेळी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बविआ, सीपीएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी एकत्र लढली होती. विधानसभा निवडणुकीत पालघर सोडले तर बाकी पाचही विधानसभा मतदारसंघांत महाआघाडीने विजय मिळवत भाजपचा धुव्वा उडवला होता. मात्र यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हीच आघाडी जि.प.मध्येही होणार का, असाही सवाल आता उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा झाली. या वेळी राज्यात चांगला संदेश देण्यासाठी अशी आघाडी जि.प. निवडणुकीत शक्य असून तसा आदेशही येऊ शकतो. यामुळे तशीही आणि स्वबळाचीही अशा दोन्ही तयारी ठेवा, अशा सूचना करण्यात आल्याने या आघाडीची शक्यता अजिबात नाकारता येत नाही, मात्र पालघरात अशी महाविकास आघाडी करताना अनेक अडचणी येऊ शकतात. कारण सत्ता स्थापनेनंतर बविआ या आघाडीत सामील झाली असली तरी सीपीएमने मात्र पाठिंबा दिलेला नाही. यामुळे सीपीएम वगळता आघाडी करायची ठरल्यास विधानसभेसाठी झालेल्या महाआघाडीला तिलांजली देणे बविआ आणि राष्ट्रवादीसाठी शक्य नाही.

कारण लोकसभेत बविआ आणि विधानसभेत राष्ट्रवादीच्या पाठीमागे सीपीएम खंबीरपणे उभी राहिली होती, मात्र आता महाविकास आघाडीतील सेनेच्या समावेशामुळे सीपीएम या आघाडीत राहील का? याबात शंका उपस्थित होत आहे. तसे न झाल्यास याचा थेट परिणाम काही जागांवर होऊ शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडी झाल्यास जिल्ह्यात आठही तालुक्यांतील पंचायत समिती आणि जि.प.वर महाविकास आघाडीची सत्ता असेल, अशी स्थिती आहे. दुसरीकडे जर सगळेच स्वबळावर लढले तर आज जशी परिस्थिती आहे, त्यात थोड्याफार प्रमाणात बदल होऊन राष्ट्रवादीच्या जागा वाढू शकतील, मात्र यानंतरही आज ज्या पद्धतीने भाजप, सेना, बविआ यांनी मिळून सत्ता स्थापन केली आहे, तशी स्थिती आता होणार नाही. मात्र निवडणुकीनंतर सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ मिळून सत्ता स्थापन करू शकतील.

भाजप जिल्ह्यात एकाकी पडल्याचे चित्र
जिल्ह्यात भाजपाला या निवडणुकीत धक्का बसू शकतो. कारण खासदार-आमदार नसलेली भाजप जिल्ह्यात एकाकी पडलेली दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीनंतर हे सरकार राज्याला स्थिर सरकार देऊ शकते.
आमची आघाडी विचारातून समसमान विकास कार्यक्रमातून झालेली असल्याचा संदेश देण्यासाठी या जि.प. निवडणुकीत ही महाविकास आघाडी शक्य असल्याचे सूतोवाच आज तरी सर्वच पक्षांकडून केले जात आहे. यामुळे कोण कोणत्या आणि किती जागा लढणार आणि स्थानिक पातळीवर एवढ्या कमी वेळात मनोमीलन होईल का, याही बाबी ही आघाडी होताना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Web Title: Palghar ZP Can elections with maha vikas aghadi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.