पालघर जि. प.साठी ७ जानेवारीला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:46 PM2019-12-17T22:46:54+5:302019-12-17T22:47:02+5:30
मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली असून १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील.
पालघर : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ८ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी मंगळवारी केली.
पालघर जि. प.ची व पंचायत समितीची मुदत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संपुष्टात आली असून जि. प.च्या ५७ गटांसाठी तर पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि वसई अशा ८ तालुक्यातील एकूण ११४ गणाच्या जागेसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांची भंबेरी उडाली आहे. संबंधित ठिकाणी मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली असून १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. २२ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी २४ डिसेंबर रोजी होईल. अपील नसल्यास ३० डिसेंबर रोजी उमेदवारी मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी १ जानेवारी २०२० रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल.
मतमोजणी संबंधित ठिकाणी ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांसाठी ही निवडणूक होत असून २९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या ११४ जागांसाठी निवडणूक होईल. त्यातील ५७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.
अशी असेल सदस्य संख्या
तलासरी व विक्रमगड तालुक्यात प्रत्येकी जिल्हा परिषद सदस्य ५ तर पंचायत समिती सदस्य १०, जव्हार आणि वसई तालुक्यात प्रत्येकी जिल्हा परिषद सदस्य ४ तर ८ पंचायत समिती सदस्य, डहाणू तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य १३ तर पंचायत समिती सदस्य २६, वाडा तालुक्यात ६ जिल्हा परिषद सदस्य तर १२ पंचायत समिती सदस्य, पालघरमध्ये सर्वाधिक १७ जिल्हा परिषद सदस्य तर ३४ पंचायत समिती सदस्य तर मोखाडा ३ जिल्हा परिषद सदस्य तर ६ पंचायत समिती सदस्य असणार आहेत.