पालघरची अ‍ॅकॅडमी मोदींनी गुजरातला पळविली

By admin | Published: February 9, 2016 02:20 AM2016-02-09T02:20:57+5:302016-02-09T02:20:57+5:30

सफाळे जवळील खार्डी येथील उभारण्यात येणाऱ्या कोस्टल पोलीस अ‍ॅकॅडमीसाठी आघाडी सरकारने केंद्र सरकारला विनामोबदला जमीन दिली. या अ‍ॅकॅडमीच्या स्थापनेमुळे परिसरात

Palghar's Akademi Modi escaped to Gujarat | पालघरची अ‍ॅकॅडमी मोदींनी गुजरातला पळविली

पालघरची अ‍ॅकॅडमी मोदींनी गुजरातला पळविली

Next

पालघर : सफाळे जवळील खार्डी येथील उभारण्यात येणाऱ्या कोस्टल पोलीस अ‍ॅकॅडमीसाठी आघाडी सरकारने केंद्र सरकारला विनामोबदला जमीन दिली. या अ‍ॅकॅडमीच्या स्थापनेमुळे परिसरात विकासाचे जाळे निर्माण होणार असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही अ‍ॅकॅडमी आपल्या गुजरात राज्यात पळविली. यावेळीही आपले मुख्यमंत्री मात्र बघ्याची भूमिका घेत बसले, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर येथील पत्रकार परिषदेत केला.
पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेसाठी आज माजी मुख्यमंत्री चव्हाण पालघर येथे आले होते. त्यावेळी केंद्रीय निरीक्षक बालाबच्चन, आ. भाई जगताप, राजेंद्र गावित, केदार काळे, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, राष्ट्रवादीचे अनील गावड, इ. मान्यवर उपस्थित होते.
पालघर जिल्हा निर्मिती ही खर्चीक बाब असताना व मोठा विरोध असताना माझे सहकारी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी आदिवासी बहुल जिल्ह्याचा विकास होईल व अनेक विकासाच्या संधी निर्माण होतील हे मला त्यांनी पटवून दिले. त्यामुळे पालघर जिल्हा निर्मिती हा माझ्या कारकिर्दीतला एक महत्वाचा निर्णय असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या दरम्यान राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना १० लाख जनावरांसाठी चारा छावण्यांची उभारणी करून, पाण्याचे नियोजन केले. परंतु आताचे सरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार खंबीर नाही हे अधिकारी आमचे ऐकत नाहीत या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून दिसून येत असून त्यांचा सहकारी पक्ष शिवसेना सत्तेत किती दिवस राहील याबाबतही चव्हाणांनी संशय व्यक्त केला.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने आघाडी सरकारने राजमाता जिजाऊ योजना, ग्रामबाल विकास केंद्रे इ. सुरू केली. मात्र आताच्या सरकारने त्या योजना बंद केल्या आहेत.
आघाडी सरकारने नरेगा सारखी गरीबांच्या फायद्याची योजना सुरू केली. मात्र आल्या आल्या मोदींच्या सरकारने या योजनेवर टीका केली. परंतु कालांतराने ही योजना महत्वपूर्ण असल्याचे दिसून आल्यानंतर आता ती चालू ठेवणे आवश्यक असल्याचा साक्षात्कार सरकारला झाल्याचेही चव्हाणांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणाऱ्या गावितांना पुन्हा निवडून आणण्याची संधी मतदारांना मिळालेली असून या संधीचे सोने करावे, असेही शेवटी त्यांनी सांगितले.

Web Title: Palghar's Akademi Modi escaped to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.