पालघरला ‘कोरोना’चा पहिला बळी; सफाळ्यात एकाचा मृत्यू, दोघांवर कस्तुरबात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 12:42 AM2020-04-01T00:42:29+5:302020-04-01T06:26:30+5:30
सफाळे येथे मृत्यू पावलेला इसम मूळचा उसरणी येथील रहिवासी असून तो राहत असलेल्या इमारतीला पोलिसांनी सील ठोकले आहे.
पालघर/नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरात एका पुरुषाला ‘कोरोना’ची लागण होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर नालासोपारा येथील दोघांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८ झाली आहे.
सफाळे येथे मृत्यू पावलेला इसम मूळचा उसरणी येथील रहिवासी असून तो राहत असलेल्या इमारतीला पोलिसांनी सील ठोकले आहे. या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सफाळे पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये सदर इसम आपल्या नातेवाईकाकडे राहत होता. त्याला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नसल्याने त्याच्यावर तात्पुरता उपचार करीत ‘होम क्वारेन्टाईन’मध्ये ठेवण्यात आले होते. हा पेशंट कोणाकोणाच्या संपर्कात आला याची माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरीकडे नालासोपारा पश्चिम येथील निळेगाव परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये मंगळवारी कोरोनाची लक्षणे दिसून आली. यामधील पुरुष हा मुंबईच्या जसलोक रुग्णालयात काम करत होता. लॉकडाऊन दरम्यानही अत्यावश्यक सेवा चालू असल्याने तो बसद्वारे रुग्णालयात जाऊन आपली सेवा बजावत होता. त्यामुळे रुग्णालयात काम करता करता त्याला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच घरी आल्यावर या व्यक्तीचा पत्नीशी संपर्क झाल्याने तिलाही कोरोनाची लागण झाली. या दाम्पत्याला जेव्हा कोरोनाची लक्षणे दिसून आली त्या वेळी त्यांनी महापालिकेला या संदर्भात माहिती दिली.
महापालिकेने या वेळी त्याची तपासणी करून दाम्पत्याला कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.त्याचबरोबर पालिकेतर्फे या व्यक्तीच्या सोबत राहणारा त्याचा मुलगा व सुनेला हॉटेलमध्ये विलगीकरण (हॉटेल क्वारंटाईन) करण्यात आले आहे. यानंतर पालिकेतर्फे संपूर्ण परिसरात जंतुनाशक फवारणी करून सॅनिटाइज करण्यात आले आहे.
जव्हार-मोखाडातील ‘ते’ दोन रुग्ण निगेटिव्ह
जव्हार : जव्हार व मोखाडा तालुक्यातील प्रत्येकी एक-एक संशयित पुरुष यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांचे नमुने तपासणी करण्यासाठी शनिवारी पाठविण्यात आले होते, मात्र त्यांचा तपासणी अहवाल आलेला असून ते दोन्ही संशयित निगेटिव्ह असून त्यांना ‘होम क्वारन्टाईन’ करण्यात आल्याची माहिती जव्हार आरोग्य विभागाकडून मिळाली.
जव्हार व मोखाडा तालुक्यातील हे ३७ व ४० वर्ष वयोगटातील पुरुष असून त्यांना शनिवारी घशात त्रास होत होता. म्हणून तातडीने त्यांना प्राथमिक उपचार करून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पालघर येथे शनिवारी हलविण्यात आले होते. त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह असल्याची महिती जव्हार तहसीलदार संतोष शिंदे यांनी दिली.