पालघरची मुख्यालये लवकरच साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:35 AM2017-08-01T02:35:00+5:302017-08-01T02:35:00+5:30
या जिल्ह्याच्या मुख्यालयासह पाच कार्यालयांच्या उभारणीसाठी निविदा प्राप्त झाल्या असून त्यांची छाननी सुरू आहे. त्याची निश्चिती लवकरच होऊन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची उभारणी होणार आहे.
हितेन नाईक ।
पालघर : या जिल्ह्याच्या मुख्यालयासह पाच कार्यालयांच्या उभारणीसाठी निविदा प्राप्त झाल्या असून त्यांची छाननी सुरू आहे. त्याची निश्चिती लवकरच होऊन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची उभारणी होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी जमीन सिडकोकडे वर्ग करण्यात आली आहे. तसेच त्यासाठी आवश्यक तो निधिही उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
कोळगांव येथील ४४०हेक्टर जमिनीपैकी १०३ हेक्टर जमिनीवर जिल्हाधिकारी कार्यालय, दोन प्रशासकीय कार्यालये, जिल्हा पोलीस कार्यालय आणि जि.प. कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयांच्या बांधकामासाठींच्या निविदाही काढण्यात आलेल्या आहेत. या पाचही इमारतींसाठी १६२ कोटी ११ लाख २७ हजार ३६ इतकी अंदाजपत्रकीय रक्कम निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालयासाठी मिळालेल्या जागेत विविध पॉकेट्स तयार करण्यात आलेली असून त्यापैकी क्रमांक १ च्या पॉकेटमध्ये ते उभे राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत १५४९८ चौ.मी. क्षेत्रफळाची असून तिचा खर्च ३७ कोटी ७२ लाख ८९ हजार ११३ रूपये आहे. या कामासाठी १२ निविदा प्राप्त झाल्या असून तिची निश्चिती सुरू आहे. जिल्हा परिषदेचे कार्यालय २४ हजार ३४६ चौ.मी.वर उभे राहणार असून त्यासाठी ३७ कोटी ७३ लाख २७ हजार ९४९ रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी ११ निविदा प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व कार्यालये या एकाच इमारतीत साकारण्यात येणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ३ हजार ९०० चौ.मी. क्षेत्रात उभारण्यात येणार असून त्यासाठी १२ कोटी २३ लाख ८२ हजार ९८३ रूपये खर्च होणार आहेत. त्यासाठी १६ निविदा प्राप्त झाल्या आहेत. तर प्रशासकीय कार्यालयाच्या इमारत क्रमांक ए आणि बी साठी अनुक्रमे ३७ कोटी ८३ लाख ८३ हजार ४२३ रुपये तर बी साठी ३६ कोटी ५७ लाख ४३ हजार ५६५ रुपये इतका खर्च येणार असून त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे १५८६८ आणि १५४९८ चौ.मी. असेल. त्यासाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. जव्हार येथील प्रसिद्ध राजवाड्याच्या वास्तू रचनेनुसार या इमारतींची रचना असणार आहे. त्यात आदिवासी संस्कृतीचे प्रतिबिंब देखील जाणिवणार आहे.
सिडकोला जिल्हा मुख्यालय व नवे पालघर वसविण्याचे काम दिल्यानंतर तिने नव्या पालघरचाही आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जिल्हा मुख्यालय व नवे पालघरसाठी अनुक्रमे १०३ व ३३७ हेक्टर जमीन सिडकोकडे वर्ग करण्यात आलेली आहे. एकूण ४४० हेक्टरमध्ये सिडकोने ७ पॉकेट्स तयार केले आहेत. पहिल्या पॉकेटमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि दोन प्रशासकीय कार्यालये असतील. याशिवाय जिल्हा व सत्र न्यायालय व शासकीय विश्रामगृह, आॅडीटोरीयम व कर्मचारी निवासस्थाने यांचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे लवकरच पालघर आणि बोईसर मिळून नवी महानगरपालिका होणार असून तिच्या मुख्यालयासाठी या आराखड्यात जागा राखीव ठेवण्यात आली आहे. या परिसराची भौगोलिक पहाणी व मृदा परिक्षण पूर्ण झालेले आहे. या इमारतींच्या आराखड्यांची तपासणी करण्यासाठी व्हीजेटीआयची नियुक्ती करण्यात आली आहे.