पालघरच्या दोन कंपन्या बंद
By Admin | Published: June 30, 2017 02:37 AM2017-06-30T02:37:23+5:302017-06-30T02:37:23+5:30
अलीकडेच काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियामक मंडळाने बोईसर एमआयडीसी परिसरातील प्रदूषण करीत असलेल्या कंपन्यांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : अलीकडेच काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियामक मंडळाने बोईसर एमआयडीसी परिसरातील प्रदूषण करीत असलेल्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उचलला होता व त्या कंपन्या बंद करण्याचे आदेशही दिले होते. मात्र पालघर मध्येही कंपन्यांमार्फत प्रदूषण सुरु असताना त्यावर कारवाई अपेक्षित होती. प्रदूषण मंडळाने दिलेल्या आदेशानुसार पिडको औद्योगिक वसाहतीतील सेफेक्स फायर सर्व्हिसेस व डिलक्स रिसायकलिंग लि. मी. या दोन कंपन्या तात्काळ बंद करण्याचे आदेश पालघर प्रांताधिकारी विकास गजरे यांनी दिले आहेत.
प्रदूषण नियामक मंडळाच्या म्हणण्यानुसार या दोन्ही कंपन्या प्रदूषित वायू सोडत आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत असून त्याच्या उग्र वासामुळे रहिवाशांना श्वासोच्छवासास प्रचंड त्रास जाणवण्याची शक्यता आहे. या कंपन्यांसमोरच जिल्हाधिकारी कार्यालय असल्यामुळे त्यांनी या त्रासाचा अनुभव घेतल्यानंतर प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली होती. तिच्या अनुषंगाने मंडळाने प्रत्यक्षात पाहणी केली. डिलक्स या कंपनीतून प्रमाणाबाहेर प्रदूषित वायू हवेत सोडला जात असल्याचे तर सेफेक्स कंपनीने हवेतील प्रदूषण नियंत्रित करणारी आवश्यक यंत्रणा बसविलेली नसल्याचे मंडळास आढळून आले. त्यानंतर मंडळाने या दोन्ही कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. प्रांताधिकाऱ्यांनी फौजदारी दंड संहिता १९७३ कलम ११३ नुसार दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
या सुनावणीत कंपन्यांनी त्यांना घालून दिलेल्या अटी शर्तींचे पालन केलेले नाही तसेच कंपन्याद्वारा होणाऱ््या प्रदूषणामुळे परिसरात राहणाऱ्यांच्या जीवितास व आरोग्यास उपद्रव होण्याची शक्यता असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी नमूद करुन या कंपन्या तात्काळ बंद करण्याचे आदेश काल दिले. या कंपन्यांप्रमाणे अशा बऱ्याच प्रदूषणकारी कंपन्या या परिसरात आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे.