वसई तालुक्यातील पाली-सत्पाळ्यात ४० जणांची माघार, ३५ उमेदवार रिंगणात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:15 AM2021-01-05T00:15:51+5:302021-01-05T00:15:57+5:30

१५ जानेवारी रोजी मतदान : १८ जानेवारीला होणार उमेदवारांचा फैसला

In Pali-Satpala of Vasai taluka, 40 candidates withdrew, 35 candidates in the fray | वसई तालुक्यातील पाली-सत्पाळ्यात ४० जणांची माघार, ३५ उमेदवार रिंगणात 

वसई तालुक्यातील पाली-सत्पाळ्यात ४० जणांची माघार, ३५ उमेदवार रिंगणात 

Next

सुनील घरत
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ :  वसई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता ३५ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
  कोरोनाकाळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून यात पालघर जिल्ह्यात फक्त तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पालघर तालुक्यातील सांगावे तसेच वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. वसईतील दोन ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७५ अर्ज आले होते. माघार घेण्याच्या दिवशी ४० जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता सत्पाळा ग्रामपंचायतीमध्ये २७ उमेदवार तर  पालीमध्ये आठ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर कोरोना महामारीमुळे कोणतीही निवडणूक न झाल्याने वर्षभरातील ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्ते यांनाही या ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता आहे. 

सर्वच राजकीय पक्षांचे 
उमेदवार आजमावताहेत नशीब
वसई तालुक्याच्या ग्रामीण भागात होत असलेल्या दोन ग्रामपंचायत निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आधी बहुजन विकास आघाडीची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये अन्य पक्षांनीही मोठा जोर लावला आहे. 

उमेदवारांची निवडणुकीतून 
मोठ्या प्रमाणात माघार 
प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी असते. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींच्या केवळ ७ प्रभागांसाठी तब्बल ७५ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र 
देण्या-घेण्याचे व्यवहार तसेच अन्य बाबींमधील मतैक्यानंतर ४० जणांनी माघार घेतली आहे. 

वसई तालुक्यातील पाली आणि सत्पाळा या दोन ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या  निवडणुकीमध्ये उमेदवारांना सोमवारीच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. १५ जानेवारी रोजी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. परिसरात काही अनुचित घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जात असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 
-उज्ज्वला भगत, 
तहसीलदार, वसई

राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची लढाई 
कोरोनानंतर येथील राजकीय पक्षांसाठी ही पहिली निवडणूक असल्याने ती जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागणार आहेत. वसई तालुक्यात वर्षभरात वसई-विरार शहर महापालिका तसेच अनेक काही ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: In Pali-Satpala of Vasai taluka, 40 candidates withdrew, 35 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.