वसई परिसरात वानराची दहशत; विद्यार्थी, नागरिकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 10:58 PM2020-01-12T22:58:45+5:302020-01-12T22:59:13+5:30
वनविभागाकडून विशेष पथकाची नियुक्ती
पारोळ : वसई तालुक्यातील पूर्व भागाला लाभलेल्या डोंगरी भागातील खानिवडे व परिसरातील नवसई, शिवणसई, शिरसाड, खराटतारा आदी भागात मागील चार-पाच दिवसांपासून एका जंगली वानराचा मुक्त संचार सुरू असून त्याच्या दहशतीमुळे भागातील महिला व विद्यार्थी एकट्याने घराबाहेर पडण्यात घाबरत आहे.
अजूनपर्यंत वनराने कुणावरही हल्ला केला नसला तरी या परिसरातील विद्यार्थी तसेच महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. हे वानर
शिरसाडच्या जगद्गुरू नरेंद्राचार्य मठात, गावातील घरादाराच्या ओट्यावर व अंगणात असलेल्या दुचाक्यांवर बिनधास्त बसत असल्याचे
दिसून आले आहे. त्याच्या मुक्त संचाराने या भागातील नागरिकांत त्याच्या दहशतीची छाया पसरली असून वनखात्याला याची वर्दी
दिल्याप्रमाणे वनकर्मचारी व डहाणू येथील विशेष पथक वानराला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र शनिवारीही त्यांच्या जाळ्यात हे वानर सापडले नाही. साधारण चार ते पाच फूट उंची, त्याहीपेक्षा जास्त लांबीची शेपटी, आयाळीसह अंगभर सफेद केस आणि काळ्या तोंडाचे नर जातीचे हे वानर आहे. दिवसभरात हे वानर सकाळी प्रतिभा विद्यामंदिर शाळेतील मुलांच्या घोळक्याकडे धावून आले होते. तर दोन सत्रांत शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस हे वानर विद्यार्थ्यांबरोबर येत असल्याचे दिसताच बेसावध
विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. सदर वानर हे तुंगारेश्वर अभयारण्यातून आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच खानिवडे येथील जंगलात अशी अनेक वानरे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या वानराला जेरबंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशेष पथकाच्या गाडीवर सुद्धा हे वानर बसले होते. मात्र तरीही ते हातातून निसटल्याचे पथकाकडून सांगण्यात
आले.
या भागातील जंगलांत माणसांनी केलेल्या अतिक्रमणामुळे जंगली प्राणी मनुष्य वस्त्यांमध्ये घुसत असल्याचे जाणकार सांगत असून
लवकरच हे वानर जेरबंद करू असे वनकर्मचाऱ्याने सांगितले.