वसई विरारमधील उद्याने झालीत वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:46 AM2018-09-19T03:46:24+5:302018-09-19T03:46:48+5:30
आधी महापालिकेचा हास्यास्पद खुलासा नंतर वाहने हटविली
नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने लाखो रूपये खर्चून बांधलेल्या उद्यानांचे सध्या बेकायदा वाहनतळ झाले आहे. पालिका कर्मचा-यांशी मिलीभगत करून धनदांडग्यांच्या आलिशान गाड्या उद्यानात बेकायदेशीररित्या पार्क केल्याच्या तक्रारी नागरीकांकडून येत असतांना, गणेशोत्सवात रस्त्यावर अडचण निर्माण करणारी वाहने तात्पुरती उद्यानात पार्क केल्याचा अजब खुलासा पालिकेच्या प्रभारी सहआयुक्तांनी केला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीया वर फोटो व्हायरल होताच आयुक्तांनी या गाड्या सोमवारी हटविल्या.
वसई रोड पश्चिमेकडील आनंदनगर येथे महापालिकेचे वि.दा. सावरकर उद्यान आहे. यात बच्चे कंपनीसाठी विविध खेळणी बसविण्यात आली आहेत. तसेच जेष्ठ नागरीकांसाठी विरंगुळा म्हणून बसण्याची व्यवस्था केली आहे.मात्र या उद्यानात गेल्या काही दिवसांपासून अनेक खाजगी कारपार्क केलेल्या आहेत. त्यामुळे या उद्यानाला वाहनतळाचे रूप आल्याचा आरोप येथील स्थानिक नागरीकांकडून करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या वाहने उभी केली जात असल्यामुळे लहान मुलांना धड खेळताही येत नाही.
उद्यानातील बेकायदा वाहनतळामुळे लहान मुलांची गैरसोय होत असून याबाबत पालिका कर्मचा-यांकडे तक्रार केल्यास ते दुर्लक्ष करतात, असा आरोप स्थानिक रहिवासी अमित शहा यांनी केला आहे या उद्यानात मुले खेळण्यासाठी तसेच जेष्ठ नागरीक विरंगुळा म्हणून येत असतात मात्र अनधिकृत वाहने पार्क केल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.
पालिकेचे प्रभाग समिती एचचे प्रभारी सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्साल्वीस यांनी, नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ही वाहने तात्पुरती उद्यानात आणून ठेवली असल्याचे सांगितले गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळे विविध कार्यक्र म करतात. त्यामुळे रस्ता वाहतुकीस अडचण होणारी वाहने हटवून ती उद्यानात ठेवली असल्याचे अजब कारण त्यांनी दिले. सोशल मिडीया वर दोन दिवसांपासून उद्यानाचे फोटो व्हायरल होताच सहाय्यक आयुक्तांनी पालिका कर्मचा-याद्वारे या गाड्या हटविल्या.