भूमाफियांसोबत पार्टी महागात, वसई-विरार महापालिकेच्या दोन अभियंत्यांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:52 AM2024-03-05T11:52:46+5:302024-03-05T11:53:34+5:30
पालिकेच्या पेल्हार ‘एफ’ प्रभागातील ठेका अभियंता भीम रेड्डी तसेच चंदनसार प्रभागातील ठेका अभियंता मिलिंद शिरसाट यांची एक चित्रफीत वायरल झाली होती.
नालासोपारा : भूमाफियांसोबत पबमध्ये केलेली पार्टी आणि तरुणींसोबत केलेले नृत्य वसई-विरार महापालिकेच्या दोन अभियंत्यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने त्यांची सोमवारी तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. पालिकेची प्रतिमा मलिन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भीम रेड्डी आणि मिलिंद शिरसाट, अशी हकालपट्टी केलेल्या या दोन अभियंत्यांची नावे आहेत.
पालिकेच्या पेल्हार ‘एफ’ प्रभागातील ठेका अभियंता भीम रेड्डी तसेच चंदनसार प्रभागातील ठेका अभियंता मिलिंद शिरसाट यांची एक चित्रफीत वायरल झाली होती.
वसई-विरार शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांसोबत हे दोघे एका पबमध्ये पार्टी करताना दिसत होते. त्यांच्यासोबत काही तरुणी नृत्य करीत होत्या. ही चित्रफीत व्हायरल होताच खळबळ उडाली होती. त्याची गंभीर दखल घेत पालिकेने त्यांची हकालपट्टी
केली आहे.
‘कर्तव्यात कुणीही कसूर केल्यास कठोर कारवाई’
अतिक्रमण विभागात हे दोघे अभियंता काम करत होते. तरीदेखील अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांसोबत पार्टी करणे अत्यंत गंभीर आहे.
सार्वजनिक ठिकाणी नृत्य करून त्यांनी पालिकेची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे या दोघांची हकालपट्टी केली असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली.
कर्तव्यात कुणीही कसूर केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
चित्रफीत आठ महिने जुनी
- ही चित्रफीत आठ महिने जुनी आहे. एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या चित्रफितीच्या आधारे या दोघांना ब्लॅकमेल करत होते. या दोन अभियंत्यांनी त्यांना लाखो रुपये दिल्याचीही चर्चा आहे.
- २०१७ मध्येदेखील एका खासगी पार्टीत नृत्य करणाऱ्या १२ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते.