पार्टीतील वादातून मित्राला कारने टक्कर देऊन चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:35 AM2018-01-17T00:35:18+5:302018-01-17T00:35:21+5:30
मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन एकाच्या मृत्यूमध्ये झाल्याची घटना तालुक्यातील आच्छाड येथे मंगळवारी पहाटे घडली
तलासरी : मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन एकाच्या मृत्यूमध्ये झाल्याची घटना तालुक्यातील आच्छाड येथे मंगळवारी पहाटे घडली. या प्रकरणी आरोपी निमेश तन्हा हा फरारी असून तलासरी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पूजा जाधव हिच्या वाढिदवसानिमित्त तालुक्यातील आच्छाड येथे सोमवारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तीमध्ये वापीहुन आलेले निमेश तन्हा व परमजीत सिंग यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले होते. मात्र, मित्रांनी मध्यस्थी करुन तो सोडविला. मात्र, पहाटे पर्यंत चाललेल्या या पार्टीतून परत चाललेल्या मित्रांनी निमेशला सोबत घेतले नव्हते. या रागातून त्याने मित्र चाललेल्या कारला आपल्या गाडीने टक्कर दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी उतरलेल्या प्रतीक कांतिभाई पटेल (रा. वापी) याला त्याने जोराची धडक दिली. त्यात तो चिरडून मृत्यूमुखी पडला. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडल्यानंतर आरोपी फरार झाला असल्याचे तलासरी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रात्रभर सुरू असलेल्या हॉटेलमध्ये पार्ट्या व त्यानंतर हत्या झाल्याने रात्रभर सुरू असलेल्या हॉटेलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.