काम संपल्यावरही ५० मिनिटे प्रवाशांना धरले वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:12 PM2019-12-25T23:12:14+5:302019-12-25T23:13:00+5:30

गर्डर टाकून झाल्यावरही वाहतूक बंद : रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर चाकरमानी नाराज, नियोजनाच्या अभावाची झाली टीका

Passengers were held for 5 minutes even after work was completed | काम संपल्यावरही ५० मिनिटे प्रवाशांना धरले वेठीस

काम संपल्यावरही ५० मिनिटे प्रवाशांना धरले वेठीस

Next

अनिकेत घमंडी

डोंबिवली : ठाकुर्ली येथील पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम बुधवारी सकाळी सव्वानऊ ते दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले. अभियंता विभागाने काम ५० मिनिटे आधीच पूर्ण केले असतानाही रेल्वेने पावणेदोन वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉकची मंजूर करवून घेतलेली मुदत पूर्ण केल्याने प्रवाशांचे हाल झाले. विकासकामे करण्याकरिता ब्लॉक घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र, नियोजन न केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले, अशी सार्वत्रिक भावना आहे.

या कामासाठी कल्याण ते डोंबिवली मार्गावर दोन्ही दिशांवर साडेचार तास रेल्वेसेवा ठप्प होती. त्यामुळे या ब्लॉकचा सर्वाधिक फटका डोंबिवली, दिव्याच्या प्रवाशांना बसला. डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांना धारेवर धरले, तर दिव्यात रेल्वे प्रवासी रेल्वेमार्गात उतरले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच पावले उचलल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.
डोंबिवली स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांनी तेथील फलाट गर्दीने फुलून गेल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. फलाट क्रमांक १ ए, २, ३ आणि ५ वर तुडुंब गर्दी जमली होती. ब्लॉक सुरू झाल्यावर विशेष लोकलसाठी प्रवाशांनी फलाट १ ए व २ वर गर्दी केली.
सकाळी सव्वानऊ ते १० वाजून ६ मिनिटे विशेष लोकल न आल्याने सगळा गोंधळ उडाला. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांनाही कठीण गेले. दीर्घकाळ लोकल न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. ते पाहून पवार यांनी रेल्वे वरिष्ठांशी संपर्क केला. त्यानंतर, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक लोकल आली. त्यात दिवा, कोपरच्या प्रवाशांनी गर्दी केल्याने डोंबिवलीच्या प्रवाशांना त्यात घुसण्याकरिता झटापट करावी लागली. यामुळे डोंबिवलीकर आणखीनच संतापले. स्थानक प्रबंधकांशी प्रवाशांची वादावादी झाली. त्यानंतर, आलेल्या गाड्या तुलनेने रिकाम्या आल्याने कशीबशी गर्दी नियंत्रणात आली. ब्लॉकच्या कालावधीत डोंबिवली- सीएसएमटी मार्गावर नऊ विशेष लोकल सोडण्यात आल्या.
दिव्यातही भरपूर गर्दी होती. रेल्वेगाड्या येत नसल्याने प्रवासी रेल्वेमार्गातच उभे होते. आता ते तेथेच बैठक मारून आंदोलन सुरू करतील, अशी भीती पोलिसांना वाटत होती. परंतु, पुलाचे काम होणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रवाशांना केल्यावर आणि पोलिसांनी तातडीने रेल्वेमार्गातील प्रवाशांना तेथून हुसकावल्याने दिव्यात आंदोलन झाले नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. आदेश भगत यांनी दिली. लोकल येत नसल्याने अनेक प्रवासी माघारी गेल्याचेही ते म्हणाले. कल्याण ते कसारा, कर्जत मार्गावरील विशेष लोकलसेवा सुरळीत सुरू होती, त्यामुळे कल्याण स्थानकातील गर्दी वगळता अन्य स्थानकांत फारसा गोंधळ झाला नाही. लोकलसेवेचा बोजवारा उडाल्याबद्दल कल्याण स्थानकात अडकलेल्या प्रवाशांमध्ये नाराजी होती. लांब पल्ल्यांच्या प्रवाशांचे हाल झाले. काहींनी कसारा, इगतपुरी येथूनच रस्तामार्गे मुंबई गाठण्यासाठी धावपळ केली. ठिकठिकाणच्या कोंडीने त्यांचेही हाल झाले. ज्यांनी लोकलनेच प्रवास केला, त्यांचा प्रवास रडतखडत झाला. कर्जत, पनवेलमार्गे दिव्यात आलेल्या प्रवाशांनाही गर्दी तसेच गोंधळाचा फटका बसला. लोकलसेवा सुरळीत होईस्तोवर सामान, कुटुंबासमवेत त्यांना कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकातच ताटकळत बसावे लागले.

रेल्वेचे टीमवर्क आणि ४०० टन वजनाची लिफ्टिंग के्रन
च् ठाकुर्ली रेल्वेस्थानकात मुंबई दिशेकडील पादचारी पुलासाठी ४०० मेट्रीक टन वजनाचे सहा मीटर रुंद चार गर्डर टाकण्यासाठी बुधवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरुवात झाली. गर्र्डर ठेवण्यासाठी खास ४०० टन वजनाची विशेष क्रेन घटनास्थळी आणण्यात आली होती. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अभियंता (नॉर्थ झोन) दत्तात्रेय लोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. त्यासाठी ओव्हरहेड वायर, वीजपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता रमेशन, त्यांचे सहायक आणि सहअभियंता आर.एन. मैत्री या चार अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत १०० कर्मचाऱ्यांनी गर्डर उभे करण्याचे काम पूर्ण केले. त्याकरिता आणलेली क्रेन ठाकुर्ली पूर्वेला उभी करण्यात आली होती. त्यात लिफ्टिंग क्रेनचे तज्ज्ञ हजर होते. त्यांनी काम पूर्णत्वास नेले.
च्वरिष्ठ अभियंता लोलगे यांच्या माहितीनुसार, त्या ठिकाणी गर्डर घेऊन रेल्वेची विशेष गाडी आली होती. एकेक गर्डर आधी खाली घेण्यात आला. त्यानंतर, ते वर चढवण्यात आले. प्रत्येक गर्डर वर चढवण्याकरिता साधारण २० मिनिटांचा कालावधी लागला. एक गर्डर पूर्णपणे बसवण्यासाठी, वेल्डिंग, नटबोल्ड, ब्रिकवर्क अशा अन्य तांत्रिक कामांसाठी सुमारे दीड तास लागला. रेल्वेच्या क्रेनने हे काम करण्यासाठी वेळ लागला असता. त्यासाठी विशेष प्रकल्पांसाठी लागणारी खासगी लिफ्टिंग क्रेन मागवण्यात आली होती. त्यामुळे गर्डर चढवण्याचे कामजलदगतीने झाल्याचा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला. काम पूर्ण झाल्यानंतर ब्लॉक संपला असल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के. सिंग यांनी जाहीर केल्यानंतर सहाव्या मार्गिकेवरून सर्वप्रथम दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पहिली राजधानी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने धावली. त्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली.
च्सहा मीटर रुंदीच्या या पादचारी पुलासाठी सुमारे तीन कोटींचा खर्च अपेक्षित असून मार्च महिन्यापर्यंत तो पूर्ण होईल, अशी शक्यता अधिकाºयांनी व्यक्त केली. वेळेत काम सुरू केल्याने रेल्वे प्रशासनाने दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी म्हणजे ब्लॉकच्या पावणेदोन वाजण्याच्या मुदतीपूर्वी ५० मिनिटे आधीच काम पूर्ण केले.

मुंबईहून आलेल्या सगळ्या गाड्या डोंबिवलीहून परत फिरवणार होते, मग त्या कुठे गेल्या? गर्दीमुळे एखादा प्रवासी पडला तर त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेणार आहे का?
- संजय दामले, डोंबिवली

जर ब्लॉक ९.४५ वाजता सुरू होणार होता, तर ७.२१ ची टिटवाळा रद्द करण्याचे कारण काय होते? कसारा बाजूकडील गाड्या अगोदरच कमी आहेत आणि त्यात तुम्ही कुठलीही पूर्वसूचना न देता ट्रेन रद्द करता, तेव्हा लोकांचे काय हाल होणार, याची कल्पना अधिकाºयांना असते का?
- योगेश देशमुख, टिटवाळा

डोंबिवली रेल्वेस्थानकात तुडुंब गर्दी झाली होती, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाचे नियोजन कागदावर राहिल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. गर्दीमुळे त्यातून काढता पाय घेत पुन्हा माघारी फिरण्याशिवाय पर्याय नव्हता.
- अनुपा रवी मुठे, डोंबिवली

Web Title: Passengers were held for 5 minutes even after work was completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.