रेल्वेस्थानक, लाेकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांत प्रवाशांचा मास्कविना वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 12:21 AM2021-03-10T00:21:04+5:302021-03-10T00:21:43+5:30
काेराेनाचे नियम धाब्यावर : फिजिकल डिस्टन्सिंगचा गर्दीमुळे उडताेय फज्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : सर्वसामान्यांसाठी बंद असलेल्या लाेकलमुळे अनेकांना जादा पैसे मोजून आणि आटापिटा करून कामाचे ठिकाण गाठावे लागत हाेते. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली लाेकल सेवा सर्वांसाठी खुली करण्याची मागणी जाेर पकडत हाेती. अखेर या मागणीची दखल घेउन काही नियम आणि अटी-शर्तींसह सर्वसामान्य प्रवाशांना १ फेब्रुवारीपासून परवानगी देण्यात आली. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये कामाला जाणाऱ्या नाेकरदारांना माेठा दिलासा मिळाला. मात्र, लाेकल प्रवास सुरू हाेताच माेठ्या प्रमाणात गर्दी वाढून काेराेनाच्या सुरक्षा नियमांनाच प्रवाशांनी गर्दीत चिरडून टाकल्याचा प्रत्यय येत आहे. मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून प्रवासी बेफिकीरपणे प्रवास करताना दिसत आहेत.
रेल्वेस्थानक आणि लोकलमध्ये दरराेज गर्दी वाढत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा यंत्रणेच्या डाेळ्यादेखतच फज्जा उडत असताना त्याकडे दुर्लक्ष करावे लागत आहे. लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या अशा दाेन्हींकडे हीच स्थिती आहे. मास्क हा नाक आणि ताेंड झाकेल अशा पद्धतीने घालणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकांचा मास्क हा अलगद हनुवटीवर आलेला पाहायला मिळताे.
अनेक जण तर अशा स्थितीत इतरांशी गप्पा आणि फाेनवर बाेलत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते. काही प्रवासी तर चक्क तो डोळ्यावर लावून झाेप काढत असल्याचेही दिसते. लॉकडाऊन उठल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या जिल्ह्यातून धावत आहेत. त्यातील काही गाड्यांना विरार, पालघर, डहाणू येथे थांबे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लोकलमध्ये जनजागृती केली जात आहे.
स्वत:च्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक
nलांब पल्ल्याच्या गाड्यांतील आरक्षित असणारे डबे सॅनिटाइज केले जातात. पण त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. त्याचप्रमाणे प्रवासीही सॅनिटायझर वापरण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
nरेल्वे प्रवासात स्वच्छतागृहाचीही साफसफाई होत नसून तेथूनही कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. काेराेनापासून संरक्षण करण्यासाठी प्रवाशांनी स्वसुरक्षेवर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यात ढिलाई केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.
फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी फलाट तिकिटात पाचपट वाढ
मुंबईहून देशभरात जाणाऱ्या गाड्या पालघर जिल्ह्यातून जातात. त्यामुळे वसई, विरार, पालघर, डहाणू या रेल्वेस्थानकांत मोठी गर्दी असते. ती अनावश्यक गर्दी कमी करण्यासासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले आहे.
रेल्वेप्रवासात मास्क बंधनकारक आहे. ते नसल्यास प्रवास करता येत नाही. मास्क नसल्यास महापालिकेचे कर्मचारी याबाबत कारवाई करतात. कोरोनाचे नियम - अटींचे पालन करूनच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हे नियम आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने पाळणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल.
- सचिन इंगवले,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
वसई रोड