पावणे सहा कोटींची रस्ता निविदा फेटाळली

By admin | Published: May 6, 2016 01:16 AM2016-05-06T01:16:37+5:302016-05-06T01:16:37+5:30

पालघर रेल्वे स्टेशन ते मुद्रा जंक्शन माहीम रोड रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाची ५ कोटी ७५ लाख ३ हजार रुपये खर्चाची निविदा बुधवारी पालघरनगर परिषदेच्या सर्वसाधारण

Passing the road tender for six crores has been rejected | पावणे सहा कोटींची रस्ता निविदा फेटाळली

पावणे सहा कोटींची रस्ता निविदा फेटाळली

Next

- हितेन नाईक, पालघर

पालघर रेल्वे स्टेशन ते मुद्रा जंक्शन माहीम रोड रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाची ५ कोटी ७५ लाख ३ हजार रुपये खर्चाची निविदा बुधवारी पालघरनगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत फेटाळून लावण्यात आली. सत्ताधारी शिवसेना गटनेते उत्तम पिंपळे व विरोधी पक्षनेता मकरंद पाटील यांच्या टीमने या बेकायदेशीर कामाला एकजुटीने विरोध केल्याने शिवसेना सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर मिळाला आहे.
बुधवारी ४ मे रोजी पालघर स्टेशन ते माहीम या ३.१५ कि.मी. रस्त्याच्या कामाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे, पाणीपुरवठा, आरोग्य विभाग इ. विभागांशी संबंधित विकासकामे तातडीने सुरू करणे व त्यांच्या निविदांना मंजुरी देणे इ. कामासाठी तातडीच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अंत्यत महत्वपूर्ण सभेला नगराध्यक्षा प्रियंका पाटील या गैरहजर राहिल्याने उपनगराध्यक्ष उत्तम घरत यांनी अध्यक्षपद भूषविले. या सभेमध्ये ५ कोटी ७५ लाख ३ हजार रुपयांच्या खर्चाच्या निविदेला शिवसेना गटनेते उत्तम पिंपळे व त्याचे ११ नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते मकरंद पाटील, सचिन पाटील यांनी विरोध दर्शवित आक्रमक भूमिका घेतल्याने ही सभा गाजली. तर उपनगराध्यक्ष उत्तम घरत व नगरसेवक अतुल पाठक या दोघांनी या कामाला सहमती दर्शविली.
पालघर स्टेशन ते माहीम रस्ता या रस्त्यावर सुमारे ६ कोटीचा खर्च केला जात असताना त्या रस्त्याची मालकी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. अनेक वर्षांच्या मागणीनंतर आजही हा रस्ता नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आलेला नाही. अशावेळी या रस्त्यावर पालघर नगरपरिषदेने खर्च का? करावा अशी भूमिका विरोध करणाऱ्या नगरसेवकानी घेतली. तसेच अंदाजपत्रकात या खर्चाच्या संबंधातील तरतूदच नसताना यावर खर्च करणे बेकायदेशीर ठरेल असेही नगरसेवकांनी सभेत निदर्शनास आणून दिले.
दोन वर्षापूर्वी या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून पेव्हरब्लॉक बसविण्याचे कामही केले त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या भागात गेल्या पावसाळ्यात ५० लाखांचा खर्च करून मुरूम व खडीही पसरविण्यात आली होती. असे असतांना वर्ष-दीडवर्षाच्या कालावधीत पुन्हा सुमारे ६ कोटीचा खर्च करणे हा नगरपरिषदेच्या निधीचा अपव्यय असल्याची टीकाही सभेत करण्यात आली. त्यामुळे हा रस्ता सध्या संकटात सापडला असून अत्यंत दिनवाण्या अवस्थेतील हा खड्डेमय रस्ता चांगला होण्याच्या आशा मावळल्या असल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून चिखल तुडवीत प्रवास करावा लागणार आहे. सत्ताधाऱ्यातील साठमारी व विरोध यामुळे हाल मात्र शहरवासियांचे होणार आहेत.

विकासकामांना आमचा विरोध नाही परंतु अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही बेकायदेशीर कामे केली जात आहेत. ३० ते ४० टक्के जादा दराने कामे दिली जातात. याला आमचा विरोध आहे.
- मकरंद पाटील, विरोधी गटनेता, राष्ट्रवादी

निविदा फुगवलेली असून एकाच ठेकेदाराला सर्व कामे दिली जातात. अनेत नगरसेवकांच्या वार्डातील लहान-मोठी कामे होत नाहीत. मात्र कोट्यवधीची बेकायदेशीर कामे दिली जातात.
- उत्तम पिंपळे, सेना गटनेता व जिल्हाप्रमुख

बजेटमध्ये या कामाची तरतूद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची एनओसी घेतली आहे. ई टेंडरींगने कामे देण्यात आली आहेत.
- वैभव आवारे, मुख्याधिकारी

Web Title: Passing the road tender for six crores has been rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.