मागेल त्याला शेततळे योजनेतील शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:52 AM2021-01-29T00:52:37+5:302021-01-29T00:55:22+5:30
लवकर अनुदान जमा करा : शेतकरी देणार कृषिमंत्र्यांना निवेदन
विक्रमगड : ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेद्वारे तालुक्यातील ७८ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झालेले होते. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तळे खोदाई पूर्ण केली. यापैकी ६० शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, मात्र १८ शेतकरी निधी उपलब्ध न झाल्याने अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना या वर्षी मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात असल्याने तातडीने शेततळ्याचे अनुदान जमा करा, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळी उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यमान आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना निर्माण केली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला व कृषी कार्यालयात मागणी केली, परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून १८ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. तक्रारी करूनही ते जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
मागेल त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील ७८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६० लाभार्थींना अनुदान प्राप्त झाले, तर १८ जण अनुदानापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः खर्च करून ही शेततळी काढली, मात्र दोन वर्षे उलटूनही अनुदान प्राप्त झाले नाही.
मागेल त्याला शेततळे या योजनेतून मला शेततळे मंजूर झाले होते. त्यानुसार मी स्वतः खर्च करून शेततळे काढले आहे. परंतु अजूनपर्यंत अनुदान मिळालेले नाही. त्यात या वर्षी अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तरी शासनाने हे अनुदान लवकर आम्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे. - बबन दामू पाटील, शेतकरी, विक्रमगड