वसंत नगरी परिसरातील फुटपाथची दुरवस्था, पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:36 PM2019-06-18T22:36:08+5:302019-06-18T22:36:19+5:30
पादचारी गटारात पडून अपघात होण्याची शक्यता
नालासोपारा : वसई पूर्वेतील वसंत नगरी परिसरात महापालिकेने तयार करण्यात आलेल्या फुटपाथची दुरवस्था झाली असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली असून कोणत्याही क्षणी त्या ठिकाणच्या गटारात पादचारी पडून अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वसई पूर्वेकडील भागात वसंत नगरी परिसर आहे. त्यातील असलेले सेक्टर १ व सेक्टर २ मध्ये असणाऱ्या फुटपाथ व लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे फुटपाथ खाली असणारी गटारे दिसू लागली आहेत. वसंत नगरी मैदानाचेही ब्लॉक पूर्णपणे निघालेला आहेत. या फुटपाथ वरून अनेक पादचारी प्रवासी प्रवास करीत असतात तर काही प्रवाशांना फुटपाथची दुरवस्था झाल्याने रस्त्यावरून पायी प्रवास करावा लागतो आहे. अशा धोकादायक असलेल्या फुटपाथ वरून चालताना अचानकपणे पाय ठेचकाळून पडण्याची शक्यता आहे. याकडे पालिका प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
यामुळे येथील नागरिकांना रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. पालिकेने या ठिकाणच्या फुटपाथची दुरुस्ती करावी, अशी मागणीे करूनही याकडे पालिकाप्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
ज्या ठिकाणी फुटपाथची दुरवस्था झाली आहे. त्या ठिकाणची पाहणी करून उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव देखील तयार करून त्या ठिकाणच्या फुटपाथ दुरु स्तीचे काम करण्यात येईल, असे ‘‘ड’’ प्रभागाच्या बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.