चिंतामण वनगा यांना भावपूर्ण निरोप, मुख्यमंत्री, पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडून श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 04:42 AM2018-02-01T04:42:03+5:302018-02-01T04:42:28+5:30
मंगळवारी दिल्लीत निधन झालेल्या भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव बुधवारी सकाळी १०च्या सुमारास तलासरीतील कवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्या वेळी आदिवासी बांधवांना व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.
पालघर/बोर्डी - मंगळवारी दिल्लीत निधन झालेल्या भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव बुधवारी सकाळी १०च्या सुमारास तलासरीतील कवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्या वेळी आदिवासी बांधवांना व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.
अंत्यविधीसाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे यांसह वरिष्ठ भाजपा नेत्यांनी वनगा परिवाराचे सांत्वन करून वनगा यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर
दुपारी ३च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आदिवासींचा चिंतामणी हरपला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वादोनच्या सुमारास कवाडा वनगापाडा येथील वनगा यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून वनगा यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या त्यांच्याच शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव, भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. ३ वाजता आदिवासी परंपरा आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
तत्पूर्वी बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईहून त्यांचे पार्थिव अॅम्ब्युलन्सने तलासरी येथे आणण्यात आले. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी कल्याण केंद्रात आणि भाजपा कार्यालयाच्या आवारात ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुष्परथातून ते कवाडा येथील निवासस्थानाकडे नेण्यात आले. या वेळी वनगा कुटुंबीयांसमवेत समाजबांधवांनाही दु:ख आवरणे अवघड झाले होते.
हजारो समाजबांधव, भाजपा कार्यकर्ते यांनी वनगांच्या निवासस्थानासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात वनगा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा, मनीषा चौधरी, पक्ष सचिव ओमप्रकाश शर्मा आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मंत्रिमंडळ बैठकीत निधनाची बातमी कळाल्यावर शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. त्यांचे नेतृत्व संघर्षातून तयार झालेले होते तसेच त्यांच्यावर राष्ट्रीय विचारांचा पगडा होता. त्यांच्या जाण्याने खºया अर्थाने आदिवासींचा नेता हरपला आहे. मी त्यांचे विधानसभेतील काम खूप जवळून पाहिले आहे. ते तळागाळातल्यांचे प्रश्न तर मांडत होतेच; पण ते सोडवताना मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांची अपुरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करू हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री