शेवग्याच्या शेंगांनी दिला संसाराला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:39 PM2020-02-24T22:39:12+5:302020-02-24T22:39:20+5:30
मिळतो रोजगार : कुपोषणावर अत्यंत प्रभावी
वाडा : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी तसेच लहान मुलांना लोहयुक्त कॅल्शिअम आणि इतर जीवनसत्त्वे मिळावीत, यासाठी शेवग्याच्या शेंगा उपयुक्त असल्याचे लक्षात आल्यानंतर जाणीवपूर्वक त्याचा आहारात समावेश करण्याचे प्रमाण वाढते आहे. यामुळे या शेंगांचा दर दोन महिन्यांपासून प्रती किलो ४० ते ६० रुपये एवढा राहिला आहे. या शेंगांनी येथील आदिवासींच्या संसाराला चांगलाच आधार दिला आहे.
कुठल्याही प्रकारची औषधांची मात्रा नसलेल्या शेंगांना बाजारात मोठी मागणी वाढली आहे. विशेषत: हॉटेलमध्ये सांबरमध्ये शेवग्याच्या शेंगांचा अधिक वापर होत असल्याने या शेंगांना वर्षभर मागणी असते. कुपोषित बालकांच्या रोजच्या आहारात शेवगा झाडाची पाने, फुले आणि शेंगा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला तर यापासुन लोह तसेच कॅल्शिअम चांगल्याप्रकारे मिळते, आणि ते कुपोषण घालविण्यासाठी गुणकारी ठरते असे सिद्ध झाल्याने या शेंगांना या भागात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. खेड्यापाड्यातून वाडा, कुडूस येथील बाजारपेठेत शेकडो महिला या शेंगा विक्री करतांना दिसतात. या बाजारपेठेत प्रतीदिन ४ ते ५ क्विंटल शेंगांची विक्री होते. येथील महिला खेड्यापाड्यात घरोघरी जाऊन शेतकऱ्यांच्या परसदारातील शेवग्याच्या शेंगा विकत घेऊन त्या बाजारात विक्री करतात, त्यामुळे त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.