पेल्हार पोलिसांची कामगिरी, १५ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 07:24 PM2022-09-10T19:24:54+5:302022-09-10T19:25:38+5:30
घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला केली अटक.
मंगेश कराळे
नालासोपारा : पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक केली आहे. दोन्ही आरोपींकडून १५ गुन्ह्यांची उकल करून वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दुचाकी, सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१९ सप्टेंबरला पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल साई दर्शन बार व लॉजिंग तसेच नवकार ट्रेडर्स याठिकाणी चोरट्याने ६६ हजारांची चोरी केली होती. पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून सराईत आरोपी इमरान अन्सारी उर्फ छोटे उर्फ इमो आणि शफीउल्ला अतिउल्ला उर्फ सोनू यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांचा गुन्ह्यात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाल्यावर ४ सप्टेंबरला अटक करण्यात आल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
तपासादरम्यान पेल्हार पोलीस ठाण्यातील १० गुन्हे, वसई रेल्वे येथील तीन आणि आचोळे व गोरेगाव येथील एक एक असे एकूण १५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे २० मोबाईल, ५३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ४२ ग्रॅमचे चांदीचे दागिने, एक दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दोन्ही सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपींना ४ सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांत त्यांची पोलीस कोठडी सुरू असून तपास करत आहे.
विलास चौगुले
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)