पेल्हार पोलिसांनी ४ आरोपींना ४९ किलो गांजासह केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 07:25 PM2024-05-23T19:25:09+5:302024-05-23T19:25:42+5:30
पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा : पेल्हार पोलिसांनी बुधवारी सोपारा फाटा आणि तुंगारफाटा येथून चार आरोपींना ४९ किलो गांजासह अटक केले आहे. पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे. हा इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून व कोणासाठी आणला होता याचा पोलीस तपास करत आहे.
सोपारा फाटा येथे दोघे आरोपी गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा रचून बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मुक्तार सय्यद (३१) आणि ४९ वर्षीय महिला आरोपी असे दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांच्याकडे असलेल्या काळया बॅगेत ५ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा २५ किलो गांजा मिळून आला आहे. पेल्हार पोलिसांनी गांजा जप्त करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेत तुंगार फाटा येथे दोघे आरोपी गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा रचून बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी मनोज यादव (३०) आणि मनोज साव (३०) असे दोघांना ताब्यात घेतले. रिक्षातून आलेल्या त्या दोघांच्याकडे असलेल्या फायबर सुटकेसमध्ये ५ लाख २८ हजार रुपये किंमतीचा २४ किलो गांजा मिळून आला आहे. पेल्हार पोलिसांनी गांजा जप्त करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (प्रशासक) शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, निखिल मंडलिक, संजय मासाळ, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी केली आहे.