दिवाळीच्या पूर्वसंध्येला हरवलेले लाखोंचे २७ मोबाईल पेल्हार पोलिसांनी नागरिकांना केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2023 02:49 PM2023-11-12T14:49:19+5:302023-11-12T14:50:10+5:30
मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी पेल्हार पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, पेल्हार पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला परत केले आहेत. मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र, पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी अंदाजित अडीच लाख रुपये किंमतीचे २७ मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना ते परत केले आहेत.
पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी २ ते ३ महिन्यांपूर्वी हरवलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती घेत विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले. गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. त्यामुळे हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी पेल्हार पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
मोबाईल ही नागरिकांसाठी महत्वाचा विषय असतो. चोरी गेल्याने आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय अनेकांचा महत्वाचा डाटाही जातो. त्यामुळे यासंबंधित नागरिकांच्या भावना वेगळ्या असतात. मोबाईलची कधी चोरी होते, तर कधी हरवतो. पोलिसांकडून दाखला मिळवून नवे सिमकार्ड मिळवून अनेक जण नवा मोबाईल सुरू करतात. असे असले तरी त्यांच्या दृष्टीने हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल तेवढाच महत्वाचा असतो. त्याचा शोध घेता येत नाही, तक्रारही नोंदवून घेतली जात नाही, यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांचे मत खराब होते. तर दुसरीकडे चोरांचे धाडस वाढते. त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत लब्दे यांनी यासाठी खास मोहीम राबविण्याचे ठरविले. आपल्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांना कामे वाटप केले. तांत्रिक मदत आणि पारंपरिक तपास पद्धतीचा अवंलब करून विशेष मोहिमेत त्यांनी मोबाईल परत मिळविण्यास यश मिळविले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी केली आहे.