खिशातील चिठ्ठी आणि गुगलवरून शोध घेत तरुणाच्या हत्येची पेल्हार पोलिसांनी केली उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2024 04:52 PM2024-05-25T16:52:09+5:302024-05-25T16:54:13+5:30

मुंबई अहमदाहबाद महामार्गावर सापडलेल्या एका अनोळखी तरूणाच्या हत्येची उकल करण्यात पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे.

pelhar police solved the youths murder by searching through the pocket note and google | खिशातील चिठ्ठी आणि गुगलवरून शोध घेत तरुणाच्या हत्येची पेल्हार पोलिसांनी केली उकल

खिशातील चिठ्ठी आणि गुगलवरून शोध घेत तरुणाच्या हत्येची पेल्हार पोलिसांनी केली उकल

नालासोपारा (मंगेश कराळे) :- मुंबई अहमदाहबाद महामार्गावर सापडलेल्या एका अनोळखी तरूणाच्या हत्येची उकल करण्यात पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. या मयताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी गुगलच्या मदतीन शोध घेत आरोपीचा माग काढल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक तर एका फरार आरोपीचा पेल्हार पोलीस शोध घेत आहेत.

१० मे रोजी मुंबई अमहदाबाद महामार्गावरील सोपारा फाट्यावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता त्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पोलिसांना मयत तरुणाच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी सापडली. त्यावर ‘एस्सेल’ असे नाव होते. तेवढ्या एका दुव्यावरून पोलिसांना मयताची ओळख पटवून हत्येचा तपास करायचा होता. 

अशी पटली ओळख.....

‘एस्सेल’ नावावरून काहीच बोध होत नव्हता. मग पेल्हार पोलिसांनी त्या चिठ्ठीवरील ‘एस्सेल’ नावाचा गुगलवरून शोध घेतला. तेव्हा विविध संकेतस्थळांची नावे समोर आली. त्यात एक नाव मानखुर्द येथील एका स्टुडियोचे होते. या स्टुडियोतून सिनेमासाठी ज्युनिअर आर्टीस्ट पुरवले जात होते. पोलिसांनी त्या स्टुडियोला भेट दिली. तेथे येणार्‍या सुमारे दिडशे लोकांना चिठ्ठी दाखवून चौकशी केली. तेव्हा एका तरुणीने चिठ्ठीचे हस्ताक्षर ओळखले. ते हस्ताक्षर संतोषकुमार यादव या तरुणाचे होते. ७ मे पासून त्याचा फोन बंद येत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ७ मे रोजी संतोषकुमारने तिला व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सनी सिंग आणि राहुल पाल असे दोन तरुण होते. मयताची ओळख पटल्याने पोलिसांचे पुढील काम सोपे झाले.

काम न मिळाल्याने केली हत्या.....

याबाबत माहिती देताना पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की, मयत संतोषकुमार यादव हा सिनेसृष्टीत मॉडेल पुरविण्याचे काम करत होता. त्याला या कामाचे एक मोठे कंत्राट मिळाले होते. त्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी असलेल्या सनी सिंग आणि राहुल पाल यांनी संतापून त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. ७ मे रोजी दोघांनी संतोषकुमारला या कामाची पार्टी देण्यासाठी बोलावले. त्याला भरपूर मद्य पाजल्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह महामार्गालगत सोपारा फाट्याजवळ टाकून दिला. पोलिसांनी सनी सिंग याला अटक केली. तर फरार राहुल पालचा शोध सुरू आहे. 

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (प्रशासक) शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, निखिल मंडलिक, संजय मासाळ, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांच्या पथकाने या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

Web Title: pelhar police solved the youths murder by searching through the pocket note and google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.