वसईतील पेल्हार, उसगाव, पापडखिंड धरणे तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:26 AM2019-08-01T00:26:53+5:302019-08-01T00:27:12+5:30
उशिरा येऊन जोरदार बरसला : जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो; पाणीप्रश्न निकाली निघणार
वसई : १५ जूननंतर दीड महिन्यांच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तसेच नदी, नाले, विहिरी, तळी तुडूंब भरली आहेत. २८ जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पालघर तसेच वसई - विरारमध्ये एक हजार मिमी.पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी सुखावला आहे. पालघर जिल्ह्यात धामणी - सूर्या या मुख्य धरणासहीत अन्य तीन मध्यम आणि लहान स्वरूपाची धरणेही जिल्हावासीयांची तहान भागवत आहेत. वसई तालुक्यातच पेल्हार, उसगाव आणि पापडखिंड अशी तीन धरणे कार्यरत आहेत. पैकी विरार पूर्वेतील पापडखिंड धरण वसई विरार शहर महापालिकेने गतवर्षी बंद केले आहे.
जिल्ह्यातील ४ धरणांपैकी वसई तालुक्यात असणारी ३ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. धामणी - सूर्या हे मुख्य धरण वगळता ३ धरणे शंभर टक्के भरली असून, धामणी ८८ टक्क्यांपर्यंत भरले आहे. सर्वच धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे वसई विरार महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी लोकमतला सांगितले.
विक्रमगड तालुक्यात जोरदार पाऊस; वाहून गेल्याने एकाचा मृत्यू
विक्रमगड : तालुक्यात सतत पडणाºया पावसामुळे खांड बंधारा, सजन बंधारा, ताबाडी नदी, देहजा नदी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. हा पाऊस असाच राहिला तर धोक्याची पातळीही ओलांडण्याची भीती आहे. या परिसरातील अनेक लहान मोठ्या पुलावरून रोज पाणी वाहून वाहतूक बंद पडण्याच्या घटना घडत आहे. या पुरामुळे तालुक्यातील वेढे, चरी, डावरे पाडा येथील पांडू भिवा डावरे हे आपले काम आटपून घरी जात असताना घाणेडा येथील पुलावरून पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायांकळी घडली. बुधवारी एका शेतात हा मृतदेह मिळाला. याबाबत तहसीलदारांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.
चिंता होती; ती गेली !
गेल्यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. महिनाभर पाऊस गायब झाला. मात्र जुलैमध्ये पावसाने हाहा:कार उडवून दिला. वसई विरार महापालिकेच्या योग्य नियोजनामुळे यावर्षी जराही पाणीकपात करावी लागली नाही. यंदाही मान्सून अपेक्षेपेक्षा २० दिवस उशीरा दाखल झाल्याने गतवर्षीचीच परिस्थिती उद्भवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, २० जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे अवघ्या तीन आठवड्यांतच महिन्याची सरासरी भरून काढल्याने जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत.