चोरट्या रेती प्रकरणी पावणे दोन लाखांचा दंड
By admin | Published: January 13, 2017 05:54 AM2017-01-13T05:54:22+5:302017-01-13T05:54:22+5:30
रेती उत्खनन आणि वाहतूकीला पालघर जिल्ह्यात बंदी असताना गुजरात राज्यातून बोईसर येथे कंटेनर मधून
पालघर/बोईसर : रेती उत्खनन आणि वाहतूकीला पालघर जिल्ह्यात बंदी असताना गुजरात राज्यातून बोईसर येथे कंटेनर मधून चोरट्या पद्धतीने रेती आणणाऱ्या चालकास पालघरचे तहसीलदार महेश सागर यांनी पकडून १ लाख ७५ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला. पालघर जिल्ह्यात काही ठराविक बंदरे वगळता सर्वत्र रेती उत्खनन आणि वाहतुकीला बंदी आहे. बेकायदेशीर रेती उत्खननामुळे नदीपात्र खोल गेली असून वैतरणा पुलाजवळील निषिद्ध क्षेत्रात बेकायदेशीररित्या रेती उत्खनन होत असल्याने रेल्वे सेवेला भविष्यात निर्माण झालेला धोका रोखण्यासाठी अनेक बंदरावरील रेती उत्खनन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे. चोरट्या पद्धतीने रेती वाहतूक करणाऱ्यांना ९९ हजार ८०० रुपयांचा दंड जाहीर केल्याने स्थानिक तस्कराना जरब बसली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चोरट्या रेती वाहतुकीलाही लगाम लावण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले असले तरी बोईसरमध्ये मोठ्या प्रमाणात अपूर्णावस्थेतील बांधकामे पडून असल्याने रेतीची मागणी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे तारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात येणाऱ्या कंटेनरचा फायदा उचलीत कंटेनरमधून अवैध रेती आणली जाते. असा कंटेनर कुरगाव येथे तहसीलदार सागर आणि मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे ह्यांनी धाड टाकून पकडला. त्यांच्या कडून दंड ही वसूल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)