दंड पाच कोटींचा, थकबाकी चार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 10:44 AM2021-12-27T10:44:53+5:302021-12-27T10:45:10+5:30
मागील वर्षांपासून ज्या वाहनचालकांची दंडाची रक्कम भरली नाही, त्यांची आता वसुली सुरू झाली आहे. ज्यांची दंडाची रक्कम भरणे बाकी आहे अशांच्या आता घरी नोटिसा पाठवल्या जात आहेत.
- मंगेश कराळे
नालासोपारा : २०२१ या वर्षात वसई-विरार वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना १,७४,३४७ केसेस करून ५ कोटी ६८ लाख २४ हजार ५५० रुपयांचा दंड बजावला असून, यापैकी १ कोटी ३४ लाख ८५ हजार ८५० रुपयांची वसुली केली आहे. मात्र तब्बल
४ कोटी ३३ लाख ३८ हजार ७०० रुपयांची थकबाकी आहे.
दंडाची रक्कम न भरणाऱ्यांच्या घरी नोटिसा
मागील वर्षांपासून ज्या वाहनचालकांची दंडाची रक्कम भरली नाही, त्यांची आता वसुली सुरू झाली आहे. ज्यांची दंडाची रक्कम भरणे बाकी आहे अशांच्या आता घरी नोटिसा पाठवल्या जात आहेत.
सर्वाधिक दंड हेल्मेट नसलेल्यांकडून
जीवाला धोका असतानाही अनेक जण हेल्मेट वापरत नाहीत. २०२१ मध्ये सर्वाधिक दंड हेल्मेट नसलेल्या चालकांना आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
दंड भरणे गरजेचे
वाहतूक पोलीस आता ई-चलानवर भर देत आहे. त्यामुळे ज्या वाहनचालकांवर केसेस झाल्याने दंडाची रक्कम भरली नाही, त्यांनी पोलीस हटकेपर्यंत बिनधास्त न राहता दंड भरायला हवा.
किती वेळा नियमभंग? किती वेळा दंड?
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक रक्कम भरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे ‘ई-चलान मशिन’ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारा वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा नियमभंग केला आहे व किती दंड झाला आहे याची माहिती उपलब्ध होते.