नियम मोडणाऱ्या दुचाकीचालकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:08 PM2019-08-31T23:08:29+5:302019-08-31T23:08:33+5:30
वाहतूक शाखेची कारवाई । ठाकुर्ली म्हसोबा चौकात सम-विषमचे फलक
डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वेतील रेल्वे समांतर रस्त्यावरील म्हसोबा चौकात ठिकठिकाणी लावलेले नो-पार्किंगचे फलक काढून हा परिसर आता सम-विषम पार्किंग (पी-१, पी-२) करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील फलक लावले असून, त्याप्रमाणे डोंबिवली वाहतूक शाखेने कारवाईलाही सुरुवात केली आहे. नियम मोडणाºया दुचाकीचालकांना शुक्रवारी २०० रुपये ई-चलन दंड ठोठावण्यात आला आहे.
ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्याच्या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिल्याने या भागात वस्ती वाढली आहे. मात्र, तेथे वाहनतळ नसल्याने म्हसोबा चौकातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दुचाकींचे पार्किंग केले जात आहे. कामावर जाणाºया नोकरदारवर्गाला आपली दुचाकी वाहने नाइलाजास्तव तेथे उभी करून रेल्वेस्थानकाची वाट धरावी लागत आहे. परंतु, याठिकाणी होणाºया पार्किंगमुळे ठाकुर्लीहून कल्याण दिशेने जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे याठिकाणी वाहने पार्क होणार नाहीत, अशी भूमिका वाहतूक शाखेने घेतली होती. त्यानुसार चौकात सुरुवातीला नो-पार्किंगचे फलक लावण्यात आले होते.
पण, कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. परंतु, वाहनचालकांची होणारी गैरसोय आणि चौकातील वाढत्या पार्किंगवर पर्याय म्हणून अखेर ‘पी-१, पी-२’ पार्किंगची अंमलबजावणी करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला. त्यानुसार, तेथील नो-पार्किंगचे फलक काढून तेथे ‘पी-१, पी-२’ चे फलक लावण्यात आले. कल्याणहून ठाकुर्लीक डे येणाºया रोडवर म्हसोबा चौकात २, ४, ६, ८ या सम तारखेला वाहन पार्क करता येईल, तर ठाकुर्लीवरून कल्याणच्या दिशेला जाणाºया रोडवर १, ३, ५, ७ अशा विषम तारखेला वाहन पार्क करता येईल, अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे या चौकात दोन्ही दिशांना सम आणि विषम तारखेप्रमाणे आलटूनपालटून वाहने पार्क करावी लागणार आहेत. परंतु, दुचाकीचालकांनी सवयीप्रमाणेच पार्क करणे सुरू ठेवल्याने शुक्रवारपासून संबंधित विभागाने कारवाईलाही सुरुवात केली आहे. यात नियम मोडणाºया दुचाकीचालकांना ई-चलन दंड ठोठावण्यास प्रारंभ झाला आहे.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
प्रारंभी नो-पार्किंगचा निर्णय घेण्यात आला होता. पण, दुचाकीचालकांची गैरसोय होता कामा नये, म्हणून पी-१, पी-२ चा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. तसे फलकही लावले असून, नियम मोडणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. याउपरही नियम मोडणे सुरूच राहिले तर क्रेनद्वारे वाहने उचलली जातील, असे डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी सांगितले.