निवृत्तीवेतन प्रकरणे २६ जानेवारीपूर्वी निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:21 AM2018-01-18T00:21:02+5:302018-01-18T00:21:02+5:30
पालघर जिल्हा परिषदेतून आठ महिन्यापर्वी सेवा निवृत्त झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची निवृत्त वेतन प्रकरणे गेल्या आठ महिन्यापासून प्रलंबित आहेत
वाडा : पालघर जिल्हा परिषदेतून आठ महिन्यापर्वी सेवा निवृत्त झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची निवृत्त वेतन प्रकरणे गेल्या आठ महिन्यापासून प्रलंबित आहेत. ती २६ जानेवारी पूर्वी अंतरिमरित्या निकाली काढण्यात येतील असे आश्वासन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाºयांशी झालेल्या चर्चे दरम्यान दिले.
आठ महिन्यापूर्वी पालघर जिल्हा परिषदेतील काही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सेवा निवृत्त होऊन त्यांना निवृत्ती वेतन व इतर कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करूनही कार्यवाही न केल्यामुळे निवृत्ती वेतनापासून ते अनेक महिन्यापासून वंचित आहेत.
नुकताच याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अशोक थूल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेचे राज्य अध्यक्ष एन.एन. ठाकूर, जिल्हा महासंघाचे अध्यक्ष डी.डी.पाटील, सरचिटणीस आर. एल. पाटील यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवऋषी यांच्याशी याबाबत चर्चा केली.