प्रेयसीला भेटण्यास गेलेल्या प्रियकराला चोर समजून संतप्त नागरिकांनी दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 10:46 AM2019-07-22T10:46:21+5:302019-07-22T10:48:51+5:30
विरारमध्ये चोर समजून नागरिकांनी एका प्रियकराला बेदम चोप दिल्याची हास्यास्पद घटना फुलपाडा येथील डोंगरी परिसरात घडली आहे.
वसईः विरारमध्ये चोर समजून नागरिकांनी एका प्रियकराला बेदम चोप दिल्याची हास्यास्पद घटना फुलपाडा येथील डोंगरी परिसरात घडली आहे. रविवारी रात्री 12च्या सुमारास याच परिसरात राहणारा एक तरुण मद्यधुंद अवस्थेत आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूने पाईप व ग्रिलवर चढून मोठ्या कसरतीने टेरेसपर्यंत पोहोचला.
दरम्यान त्याचवेळी बिल्डिंग परिसरात वावरणाऱ्या काही नागरिकांचे वर चढणाऱ्या या तरुणाकडे लक्ष गेले आणि मागील बऱ्याच दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने हा तरुण चोर असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने चोर चोर ओरडायला सुरुवात केली. परिणामी आपल्याला चोर समजत असल्याचे या तरुणाला समजताच हा तरुण दचकला व पळ काढू लागला. तो एका बिल्डिंगच्या टेरेसवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या घेत असल्याने नागरिकांना हा नक्कीच अट्टल चोर असल्याच्या संशयाला दुजोरा मिळाला.
अखेर दोनशे ते तीनशेहून अधिक संतप्त नागरिकांनी या प्रियकर चोराला खाली उतरवून बेदम चोप देत आपल्या संतापाची वाट मोकळी केली. नागरिकांच्या मारहाणीत हा तरुण बऱ्यापैकी जखमी असून, प्रेयसीला भेटण्यासाठी केलेली ही कसरत त्याला चांगलीच महागात पडली आहे. एकूणच कालचा गोंधळ बरा होता या युक्तीनुसार या प्रकरणी अद्यापही विरार पोलिसांत या घटनेची तक्रार करण्यात आलेली नाही.