करोडो रुपये खर्चूनही जनता तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:35 PM2019-09-05T23:35:04+5:302019-09-05T23:35:31+5:30
शहरात टंचाई तशीच : ५ वर्षात तब्बल ८२१ कोटी ५२ लाख ६० हजार रु पये खर्च
नालासोपारा : वसई तालुक्यातील नालासोपारा वसई, विरार आणि नायगाव या शहरांना तीन धरणांतून पाणीपुरवठा होत असून महानगरपालिकेने या पाणी पुरवठ्यासाठी पाच वर्षात तब्बल ८२१ कोटी ५२ लाख ६० हजार रुपये खर्च केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही शहरात पाणी टंचाई असून टँकर लॉबी सक्रीय झाली असून त्यांच्यामार्फत पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी केला आहे.
वसई - विरार शहर महानगरपालिका हद्दीतील शहरे तसेच गावांना सूर्या धरणातून २३० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणीपुरवठा होतो. पाणी पुरवठ्यासाठी गेल्या ५ वर्षांमध्ये ८२१ कोटी ५२ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. तरीही शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई असून विशेषत: नालासोपारा शहरात पूर्वेकडे दररोज २०० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. एकूण खर्चाचा तपशील चोरघे यांनी महानगरपालिकेच्या २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पावरून काढला आहे. यात महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यावर ८२१ कोटी खर्च केल्याचा दावा केला असल्याचे सांगितले आहे. मात्र, वसई तालुक्याला जर २६० एमएलडी पाणीपुरवठा होत असेल तर अर्धी जनता तहानलेली का आहे, असा सवाल नागरिक करत आहेत.
नालासोपाऱ्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता महानगरपालिकेने सर्वच ठिकाणी सर्व्हे करून पाणी पुरवठा सुरळीत किंवा पाईपलाईन लागतील तर टाकल्या पाहिजेत. काही सोसायट्यांना महानगरपालिकेकडून कमी पाणीपुरवठा होत असून त्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळत नसून पैसे खर्च करून बिसलेरी विकत आणून पाणी प्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
विरार पूर्वेकडी परिसरात २४ तास पाणी पुरवठा
च्विरार पूर्वेकडील फुलपाडा, कारगील नगर, मनवेलपाडा, नाना नानी पार्क या परिसरामधील चाळी, अनधिकृत इमारतींना महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून २४ तास पाण्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. कोणत्या तरी धरणाचे पाणी याठिकाणी पाईप लाईनद्वारे या परिसरात पुरवले जात असल्याचे सूत्रांकडून कळते.
च्प्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेने व्हॉल्व्हमॅन ठेवले आहेत. काही व्हॉल्व्हमॅन इमारतीकडून पैसे घेऊन जास्त पाणी सोडत आहे तर जी इमारत पैसे देत नाही तिथे कमी पाणी सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कोणकोणत्या वर्षी किती
खर्च करण्यात आला?
२०१५-१६ १४७ कोटी ७ लाख ९९ हजार
२०१६-१७ ९३ कोटी ४८ लाख ४१ हजार
२०१७-१८ ८८ कोटी ४९ लाख ७८ हजार
२०१८-१९ १७३ कोटी ६ लाख ७५ हजार
२०१९-२० ३१९ कोटी ३९ लाख ६७ हजार
बविआला आगामी नालासोपारा विधानसभेत फटका बसणार
गेल्या २५ वर्षांपासून वसई तालुक्यात पाण्याच्याच प्रश्नावरून बहुजन विकास आघाडी सत्ता भोगत आहे. पण गेल्या २ महिन्यापासून अनियमित पाणीपुरवठा तसेच गढूळ पाणी यामुळे अनेक परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालासोपारा हा बविआचा गड असूनही लोकसभा निवडणुकीत येथून शिवसेनेला बविआपेक्षा २७ हजारांचा लीड मिळाला होता. यामुळे वेळीच बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी येथे लक्ष दिले नाही तर आगामी विधानसभेत बविआला फटका बसून युतीचा उमेदवार निवडून येईल अशी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे.
टँकर लॉबीचा धंदा तेजीत
नालासोपारामध्ये अंदाजे २०० ते ३०० टँकर आहेत. हे टँकर बांधकामांना पाणी पुरवतात. आता लोकांना मनपाचा पाणी पुरवठा सुरळित होत नसल्याने अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लोकांना टँकर पुरवला जात आहे. ८०० ते १००० रु पयांच्या टँकरसाठी आता ते १८०० ते २००० रूपये घेत आहे. त्यामुळे या टँकर लॉबीचा धंदा तेजीत आहे.
ही आकडेवारी कुठून आली त्याबद्दल मला माहित नसून त्याच्याबद्दल बोलणार नाही. २६९ कोटींची शासन योजना मंजूर झाली असून ती पूर्ण केली आहे. अतिरिक्त १०० दशलक्ष पाणी वर्षापूर्वीच शहरात आले आहे. काही भागात पाणी मिळत नाही याचे कारण पाईपलाईन सगळीकडे पोहोचलेली नाही. नव्याने विकसित झालेल्या भागामध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. - महादेव जवादे (शहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग.)