महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील लोकांना गुजरातमध्ये प्रवेश बंद; नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 02:27 AM2020-05-27T02:27:11+5:302020-05-27T06:40:32+5:30
गुजरातला जाणारे सर्व रस्ते पत्रे लावून केले बंद
- सुरेश काटे
तलासरी : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नागरिकांना गुजरातमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गुजरातमधील उंबरगाव, संजाणकडे जाणारे सर्व रस्ते मातीचे ढिगारे तसेच लोखंडी पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत.
तलासरी तालुक्यात कोरोनाचा आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना गुजरातमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मातीचे ढिगारे आणि पत्रे लावून सर्वच रस्ते बंद केल्याने हजारो स्थानिकांना आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी २० कि.मी. अंतरावर जावे लागते आहे. याबाबत नागरिकांनी रस्ता खुला करण्यासाठी विनंती अर्ज केले तरी त्याचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे पालघर प्रशासनाने गुजरात प्रशासनाशी समन्वय साधून रस्ता सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असणाºया पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी, संभा सीमावर्ती भागात राहणाºया नागरिकांमधील ९० टक्के लोक हे उंबरगाव येथेच काम करतात. वेवजी या गावातील इंडिया कॉलनी येथील लोकांना ५०० मी. अंतरावरील उंबरगाव जवळ पडते. मात्र, येथे जाणारा रस्ता मातीचा ढीग टाकून बंद केला आहे. या कॉलनीत २०० कुटुंबे राहात असून त्यांना मेडिकल, दुकान तसेच रुग्णालय या सुविधांसाठी ५० कि.मी. अंतरावरील डहाणू शहरात जावे लागत आहे. लोकांना गॅस कनेक्शनही गुजरातमधून देण्यात आले आहे. तरीही हा रस्ता बंद करण्यात आला आहे.