लोकसहभागातून समाज मंदिराची गुढी
By admin | Published: May 6, 2016 01:14 AM2016-05-06T01:14:38+5:302016-05-06T01:14:38+5:30
सफाळेनजिकच्या कोरे गावात लोकसहभागातून लोकहितपयोगी समाज मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. एका गावकऱ्याने मोफत जमिन दिल्यानंतर गावकऱ्यांनी ४० लाख रुपये
विरार : सफाळेनजिकच्या कोरे गावात लोकसहभागातून लोकहितपयोगी समाज मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. एका गावकऱ्याने मोफत जमिन दिल्यानंतर गावकऱ्यांनी ४० लाख रुपये खर्चून गावासाठी समाज मंदिर बांधण्याचे काम केले.
निसर्गाने मुक्त उधळण केलेले कोरे हे गाव सफाळा स्टेशनपासून १६ कि.मी.वर वसलेले आहे. पाचकळशी वाडवळ, आगरी,कोळी, कुणबी, मांगेला असा समाज या गावात वर्षानुवर्ष गुणागोविंदाने राहतोय. या गावात अवघी २५ घरं वाडवळ पाचकळशी समाजाची आहेत. १००% साक्षर असलेल्या या समाजातील प्रत्येक घरातील व्यक्ती व्यवसाय व कामानिमित्त शहरी भागात स्थायिक झालेला असला तरी गावच्या ओढीनं ही मंडळी न चुकता आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी गावाकडे येत असतात. वेळात वेळ काढून आपल्या शेतीवाडीकडेही लक्ष देत असतात. या गावात पाचकळशी वाडवळ समाजाचे ‘आदर्श समाजसेवा मंडळ’ आहे. हे मंडळ गावाच्या विकासासाठीनेहमीच पुढाकार घेत असते.
या समाजमंदिरासाठी गावातील निरुबाई मोरेश्वर वर्तक यांनी आपल्या दिवंगत पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ जमीन दान केलेली आहे. कोरे गावातील समाज मंदिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकामखात्याने व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रमुख अतिथी आदिवासी विकास व पालकमंत्री विष्णू सावरा हे उपस्थित होते. यावेळी खासदार अँड़ चिंतामण वनगा, माजी आमदार मनीषा चौधरी, आमदार अमित घोडा विलासबंधू चोरघे , मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्रेहलता देशमुख,केसरी टुर्सचे केसरी पाटील , उद्योजक अनंत वर्तक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.