सततच्या भूकंपाने घसरला शालेय पटसंख्येचा टक्का!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:18 PM2019-07-20T23:18:44+5:302019-07-20T23:18:50+5:30
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान । पालकही झाले चिंताग्रस्त
सुरेश काटे
तलासरी : तलासरी भागात गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या भूकंपामुळे या परिसरातील शाळांमधील पटसंख्येचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी भूकंपग्रस्त शाळांतील वर्ग बाहेर बसत होते. परंतु आता पाऊस आमि चिखल, ओल यामुळे तोही मार्ग बंद झालेला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा जून्या झाल्या असून त्यातल्या बऱ्याच धोकादायक ठरल्या आहेत. अनेक गळक्या आहेत. अशा स्थितीत त्यातच वर्ग भरविले तर भूकंपाचा धक्का बसून मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने भूकंपाची मालिका सुरु झाल्यावर जे तंबू पुरविले. ते वर्ग भरविण्यास उपयुक्त व पुरेसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे तरी कसे? असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. आधीच शिक्षकांच्या कमतरतेमुळे पटसंख्या बरीचशी घसरलेली असते. त्यात आता ही नवी भर पडलेली आहे. यातील बहुसंख्य शाळा या दगड विटांची बांधणी आणि कौलारू छप्पर अशा आहेत. त्यामुळे वर्ग चालू असतांना भूकंपाचा धक्का बसला तर जिवीतहानी घडू शकते.
हा उपाय तातडीने करणे गरजेचे
जवळपास जिथे कुठे पर्यायी, मजबूत जागा उपलब्ध असेल तिथे हे वर्ग स्थलांतरीत करणे हाच एक इलाज तातडीने करणे आवश्यक आहे. कारण नव्या वर्ग खोल्या तातडीने बांधल्या जाणे शक्य नाही. त्यासाठी पुढाकार घेणार कोण? हा खरा प्रश्न आहे. आमदारांनी आपल्या निधीतून मदत केल्यास ही समस्या सुटू शकते.