सद्भावना रॅलीतून संस्कृतीचे दर्शन
By admin | Published: December 27, 2016 02:30 AM2016-12-27T02:30:10+5:302016-12-27T02:30:10+5:30
गावागावात उमटणारे नाताळ गीताचे सूर, घरोघरी उभारलेले नाताळगोठे, सजवलेले ख्रिसमस ट्री यामुळे वसई परिसर सद्या नाताळमय झालेला आहे.
वसई : गावागावात उमटणारे नाताळ गीताचे सूर, घरोघरी उभारलेले नाताळगोठे, सजवलेले ख्रिसमस ट्री यामुळे वसई परिसर सद्या नाताळमय झालेला आहे. वसईतील ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण असलेल्या या नाताळ सणानिमित्त कार्निव्हलची धूम सध्या पहायला मिळत आहे.
नाताळनिमित्ताने वसईत कार्निव्हलची सद्भावना रॅली काढण्यात आली होती. वसईतील संस्कृतीवर आधारित देखावे, स्वच्छ वसई -सुंदर वसईचा संदेश, पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या युवक -युवती,कोळी गाण्यांवर ठेका धरून नृत्य करणारे कोळी ,पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली वाडवळ व ख्रिस्ती विवाहांची लग्नाची वरात,लेझीम ,शिवाजी,राणी लक्ष्मीबाई व मदर तेरेसा यांचा पेहराव केलेले तरूण मुले-मुली सोबत उंट, घोडे, बैलगाडी या कार्निव्हलमध्ये सहभागी झाले होते. डिजे,लाईव्ह आॅर्केस्ट्रा व बॅण्डच्या तालावर वसईकर बेधुंद होऊन नाचत होते. या कार्निव्हलमध्ये गिफ्ट व चॉकलेट वाटणारा सांताक्लॉज बच्चे कंपनीचे लक्ष वेधून घेत होता. ही कार्निव्हल रॅली पहायला रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जवळजवळ ५०० नागरीकांनी यामध्ये सहभाग घेतला.
कार्निव्हलचे आयोजन
प्रभू येशूच्या जन्माचा मंगल संदेश घराघरात पोहचावा व सर्मधर्म समभावाचे नातें निर्माण व्हाव यासाठी या सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. घोगाळे येथून निघालेली कार्निव्हल सद्भावना रॅली बंगली नाका -पापडी -तामतलाव -पारनाका -रमेदी या मार्गावरून नेण्यात आली. घोगाळे ग्रामस्थांच्या वतीने गेली ५ वर्ष या कार्निव्हलचे आयोजन करण्यात येते.