वसई-विरारमध्ये खड्डेच खड्डे; दुरुस्तीचा खर्च वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:45 AM2020-07-19T00:45:34+5:302020-07-19T00:45:42+5:30
नागरिकांचे होताहेत हाल
विरार : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वसई-विरारमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले दिसत आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेसुद्धा मुश्कील होत असून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या अगोदर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू होणे गरजेचे असतानाही पालिकेने अजूनही या कामाचा शुभारंभ केला नसल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.
वसई-विरार महापालिकेने पावसाळा सुरू झाला तरी खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केलेले नाही. पालिकेने मागील दोन वर्षांपासून रस्ते दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपये खर्च केला असूनही शहरातील रस्त्यांची चाळण होत आहे.सध्या कोरोना काळ सुरू असल्याने रेल्वे सुविधा बंद आहेत. यामुळे रस्ते वाहतूक वाढली आहे. पण खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेची विकासकामे थांबवली आहेत. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. मागील आठवडाभराच्या संततधार पावसाने शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे तयार झाले आहेत.
काही ठिकाणचे डांबर वाहून गेले आहे, तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक निखळले आहेत. त्याचबरोबर अपघातांची भीती निर्माण झाली आहे. तर खड्ड्यांमुळे वाहनांचे सुद्धा नुकसान होत आहे. खड्डे भरणीची कामे झाली नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे.
पालिकेने खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. कोरोना महामारीमुळे या कामाला थोडा उशीर झाला आहे. पण लवकरच शहरातील रस्ते दुरुस्त केले जातील.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता,
वसई-विरार महापालिका
महानगरपालिका रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत आहे. काही ठिकाणी खड्डे भरण्यासाठी केवळ खडी भरली जाते. पण पावसाच्या पाण्याने खडी वाहून जाऊन रस्त्यावर इतरत्र पसरते. यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत.
- प्रफुल्ल जाधव, रहिवासी, मनवेलपाडा, विरार