मनोर पोलीस ठाण्याला प्लॅस्टिकचा आधार
By admin | Published: July 13, 2015 03:11 AM2015-07-13T03:11:27+5:302015-07-13T03:11:27+5:30
मनोर पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात कागदपत्रे भिजू नये व पोलिसांना काम करण्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून इमारतीच्या
मनोर : मनोर पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात कागदपत्रे भिजू नये व पोलिसांना काम करण्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून इमारतीच्या छतावर हजारो रुपयांचे प्लॅस्टिक टाकावे लागते. मात्र, अशा पोलीस ठाण्याच्या इमारतीकडे आजपर्यंत वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आले आहे.
७५ गावांतील नागरिकांचे संरक्षण व्हावे, गावपाड्यांत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, या उद्दिष्टाने गृह विभागाने मनोर पोलीस ठाण्याची स्थापना एका भाडोत्री घरामध्ये केली. मात्र, पावसाळा आला की, पोलिसांची मोठी धावपळ होते. छत नादुरुस्त असल्यामुळे पावसाचे पाणी आतमध्ये पडते. ठाण्यामध्ये असलेली कागदपत्रे भिजू नये म्हणून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पूर्ण छतावर प्लॅस्टिक टाकून आपले काम मनोर पोलीस करीत असतात. नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांना पावसाळ्यात आपले संरक्षण करावे लागते, अशी मनोर पोलीस ठाण्याची अवस्था आहे.
ठाणे जिल्ह्यातील अनेक पोलीस अधीक्षकांनी मनोर पोलीस ठाण्याला भेटी दिल्या,पोलीस ठाण्याची स्वतंत्र इमारत व्हावी, यासाठी नेहमी मागणी केली. परंतु, त्यांच्याकडून आजपर्यंत आश्वासनेच मिळाली. आता नवीन पोलीस अधीक्षक शारदा राऊत मनोर पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीसाठी काय पाऊल उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.