प्लास्टिक: कामचुकार स्वच्छता निरीक्षकांना संरक्षण; तर अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 07:33 PM2021-12-07T19:33:55+5:302021-12-07T19:34:02+5:30
तक्रारी जास्तच झाल्या किंवा वरिष्ठांनी सांगितले तर तेवढ्या पुरती कारवाई स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्या कडून केली जाते .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - प्लास्टिक पिशव्या आदी वस्तूंवर कायद्याने बंदी असताना देखील त्यास संरक्षण देणाऱ्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांना पाठीशी घालत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जात नाही. तर आता अतिक्रमण विभागास देखील -प्लास्टिक वर कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे .
राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्या , चमचे , स्ट्रॉ , ग्लास , डिश अश्या एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातलेली आहे . शिवाय केंद्र सरकारने देखील एकल वापराच्या प्लास्टिक ना मनाई केली आहे . परंतु मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक , मुकादम यांच्या कडून कारवाई केली जात नसल्याने शहरात राजरोसपणे प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर , विक्री सुरु आहे .
तक्रारी जास्तच झाल्या किंवा वरिष्ठांनी सांगितले तर तेवढ्या पुरती कारवाई स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्या कडून केली जाते . इतकेच काय तर प्लास्टिक पहिल्यांदा आढळल्यास ५ हजार रुपये दंड असताना स्वच्छता निरीक्षक हे केवळ १५० रुपये दंड आकारून प्लास्टिक विक्रेता वा वापरकर्त्याच्या भक्कम आर्थिक फायदा करून देत आले आहेत .
त्यातूनच प्लास्टिक विक्रेते आणि वापरकर्ते यांच्याशी स्वच्छता निरीक्षक आदींचे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याचे आरोप सातत्याने होऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे . कारण स्वच्छता निरीक्षक हे प्लास्टिक ची कारवाई असो किंवा माती व डेब्रिस भराव , अस्वच्छता आदी प्रकरणी देखील कारवाई करण्यास नेहमीच जबाबदारी झटकून टाळाटाळ करत आले आहेत .
काही दिवसां पूर्वीच बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई न करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई केली जाईल
असे पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक द्वारे म्हटले होते . परंतु शहरात पहाटे पासून प्लास्टिक पिशव्या सर्रास वापरली जात असताना प्रशासनाने स्वच्छता निरीक्षकावर कारवाईच केली नाही. त्यांना संरक्षण देत उलट आता प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईची जबाबदारी अतिक्रमण विभागा वर सुद्धा देण्यात आली आहे .
आयुक्त दिलीप ढोले यांनी आयोजित केलेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत तसे निर्देश दिले आहेत . तर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्या वर कारवाईच्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली आहे .
अतिक्रमण विभागास जबाबदारी दिली त्याचे स्वागत करत ३ नंतर रात्री पर्यंत प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई होईल अशी आशा आहे . पण पहाटे पासून प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर उघडपणे होत असताना स्वच्छता निरीक्षक आणि मुकादमांना संरक्षण कशाला ? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत .