तिवरांना प्लॅस्टीकचा विळखा
By admin | Published: December 16, 2015 12:22 AM2015-12-16T00:22:42+5:302015-12-16T00:22:42+5:30
किनाऱ्यांची धूप थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी मॅनग्रोव्हज अर्थात तिवरांची झाडे प्लास्टीक प्रदुषणात सापडली असून त्याचे विपरित परिणाम येत्या काही वर्षात होण्याची शक्यता आहे.
डहाणू : किनाऱ्यांची धूप थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी मॅनग्रोव्हज अर्थात तिवरांची झाडे प्लास्टीक प्रदुषणात सापडली असून त्याचे विपरित परिणाम येत्या काही वर्षात होण्याची शक्यता आहे. मागील काही काळापासून खाडीतून समुद्रात सोडण्यात येणारे मलनि:सारण याचबरोबर मोठया प्रमाणात येणारा प्लॅस्टीक कचरा ओहोटीनंतर तिवरांच्या झाडांमध्ये जमा होण्यास सुरूवात झाली. हे प्रदुषण तिवरांसाठी घातक आहे. जमिन विषारी बनवण्यात प्लॅस्टीक हे महत्त्वाची भूमिका बजावते. हे यापूर्वीच तज्ञांनी स्पष्ट केले आहे. दररोज येणारा हा प्लास्टीक कचरा तिवरांसाठी धोकादायक ठरणार आहे. हा कचरा दूर करून तिवरांची वने वाचवणे आवश्यक आहे. परंतु, ही जबाबदारी कोणाची? शासकीय विभाग ही जबाबदारी घेण्यास तयार नाही. त्यामुळे पर्यावरण व सामाजिक संस्थांनी याबाबत पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच डहाणू नगरपरिषदेने वसाहतींवर चाप आणणे अत्यावश्यक झाले आहे. जमिन, पाणी प्रदुषित झाल्याने त्याचा प्रथम फटका तिवरांमध्ये प्रजननासाठी येणाऱ्या सागरी जीवांना बसला आहे. प्लॅस्टीक प्रदुषणामुळे त्यांची प्रजननाची ठिकाणे बदलली. खेकडे, विविध लहान प्रजातीचे मासे यांचा त्यास समावेश आहे. ज्या भागात प्रदुषण मोठया प्रमाणात होऊ लागले तेथून हे प्राणी दिसेनासे झाले आहेत. तिवरांची संख्या कमी झाल्याने पक्षीही या भागात फिरकणे कमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. रोज येणारा प्लॅस्टीक कचरा पाहता ही समस्या जटिल स्वरूप धारण करीत आहे. त्यास थोपवणे कठीण झाले आहे. यापूर्वी समुद्र किनारे बकाल करणारे प्लास्टीक आता तिवरांना हानी पोहचवू लागल्याने शासकीय स्तरावर ते हटविण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे. दररोज शेकडो टन प्लॅस्टीक या भागात साचत आहेत. यापूर्वी सागरी किनारे स्वच्छता अभियान संस्थेमार्फत केले. यापुढे तिवरांची झाडे वाचविण्याकरिता प्रयत्न राहील. त्याकरिता शासनानेही संयुक्तरित्या प्रयत्न करायला हवेत. (वार्ताहर)