कोतवालपदाच्या अर्जासाठी लूट, आदिवासींसाठी ५०० तर ओबीसींसाठी एक हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:26 AM2017-11-11T00:26:32+5:302017-11-11T00:26:44+5:30
पालघर जिल्हयातील तालुका पातळीवर कोतवाल पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी करावयाच्या अर्जासाठी आदिवासी उमेदवारांकडून पाचशे रुपये
वसई : पालघर जिल्हयातील तालुका पातळीवर कोतवाल पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी करावयाच्या अर्जासाठी आदिवासी उमेदवारांकडून पाचशे रुपये तर इतर मागासवर्गींयासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे.
पालघर जिल्हयातील पालघर तालुक्यासाठी १०, वसई तालुक्यासाठी २३, विक्रमगडसाठी ५, जव्हारसाठी ७, मोखाड्यासाठी ३, तलासरीसाठी ९ आणि डहाणूसाठी ८ मिळून एकूण ७५ कोतवाल पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिये द्वारे भरती करण्यात येणार आहे. ७५ पैकी अवघ्या बारा जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर बहुसंख्या जागा अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती महिला, इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव आहेत. यात निवड होणाºया उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने अनेक कुटुंबे आर्थिकदृष्टया दुर्बल गटातील आहेत. याच कुटुंबातील हजारो तरुण-तरुणी कोतवाल पदासाठी अर्ज करणार आहे. मात्र, अर्जासाठी अनुसूचित जमातीसाठी पाचशे रुपये आणि इतर मागासवर्गींयासाठी एक हजार रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. या कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता अवघे पाच हजार रुपये मानधन मिळणाºया कोतवाल पदासाठी इतके शुल्क आकारणे योग्य नाही, अशी तक्रार शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.