पीएमसी बँक बंदचे जिल्ह्यात पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:14 AM2019-09-25T00:14:14+5:302019-09-25T00:14:25+5:30
नालासोपाऱ्यात तिघांना हृदयविकाराचा झटका; पैशांच्या चिंतेमुळे अनेक ग्राहक रुग्णालयात
पालघर/वसई/नालासोपारा : पीएमसी बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पालघर जिल्ह्यातील बँकेच्या व्यवहारावर बंधने आणली. अचानक आपल्या ठेवी काढण्यात बंदी आल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दरम्यान, यामुळे कामगारांचे पगार थकले असून रुग्णाचे उपचार थांबणार आहेत. बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या अनेक महिलांना आता किमान सहा महिने पैसे काढता येणार नसल्याचे कळल्यावर अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नालासोपाºयात तिघांना बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले.
रिझर्व्ह बँकेने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्याचे एसएमएस बँकेने आपल्या ग्राहकांना पाठवले आहेत. हे मेसेज मिळाल्यानंतर आपापल्या भागातील बँकेच्या शाखेबाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या. ग्राहकांना महिन्यातून केवळ एक हजार रुपयेच काढता येणार आहेत, असे सांगण्यात आल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. या बँकेत माझ्या कंपनीची चार खाती असून एका खात्यात सुमारे २५ लाख रुपये अशी रक्कम आहे. तसेच लॉकरमध्येही ठेवी असून आता सहा महिन्यांपर्यंत मला हवी ती रक्कम मिळणार नसल्याने कामगारांचे पगार कशी देणार, असा प्रश्न एका उद्योजिकेने उपस्थित केला.
वसई तालुक्यातील नालासोपारा आणि विरार पूर्व येथील शाखेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून सर्वच ग्राहक विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. बँकेच्या निर्णयामुळे आता ग्राहकांना केवळ हजारच रुपये मिळण्याच्या धक्क्याने कोणी बँकेतच चक्कर येऊन पडले तर बºयाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. तर नालासोपाºयातील पीएमसी बँकेची सेंट्रल पार्क शाखा बंद झाल्याचे कळल्यावर ग्राहकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, वसई तालुक्यातील नालासोपारा, विरार-मनवेलपाडा बँकेच्या शाखेसमोर प्रचंड गर्दी केली होती. बँकेचा हा मेसेज आल्यानंतर पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळील पीएमसी बँकेच्या आवारात मोठी गर्दी जमली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीला काबूत आणले.
नालासोपाऱ्यात बँक ग्राहकांचा रास्ता रोको
नालासोपारा : मुंबई स्थित पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून सहा महिन्यासाठी आर्थिक निर्बंध लादल्याने मंगळवारी सकाळी नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क आणि अग्रवाल सर्कल येथील बँकेच्या शाखा बंद झाल्याने ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. कायदा तसेच सुव्यवस्था बिघडू नये म्हणून दोन्ही ठिकाणी तुळिंज पोलीस आणि राखीव पोलीस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. काही काळ दोन्ही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना येण्या-जाण्यासाठी व वाहनांच्या रांगा लागल्याने थोडा त्रास सहन करावा लागला होता.
नालासोपारा पूर्वेकडील पीएमसी बँकेच्या दोन्ही शाखांमध्ये शेकडो नागरिकांचे बचत खाते तर व्यापारी वर्गाचे करंट खाते आहे. बँक बंद झाल्याची माहिती ग्राहकांना मिळताच बँकेच्या बाहेर गर्दी करण्यास सुरु वात केली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून या दोन्ही शाखांच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अग्रवाल सर्कल येथे थोड्या वेळासाठी ग्राहकांनी रागाच्या भरात रास्ता रोको केला. पण पोलिसांनी समजूत काढल्यावर हा रास्ता रोको मागे घेतला. तर सेंट्रल पार्क येथील शाखेवर ग्राहकांची मोठी झुंबड होती.
चिडलेल्या ग्राहकांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरत आमचे पैसे आम्हाला कधी मिळणार, कोण देणार असे अनेक प्रश्न विचारले. तर संतप्त महिलांनी अंदाजे एक ते दीड तास स्टेशनकडे जाणारा रास्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला होता. बांधकाम व्यावसायिक सिंग यांच्या खात्यामध्ये १८ लाख तर मनोज राऊत यांच्या खात्यात साडे आठ लाख रुपये असल्याने आता हे पैसे कधी मिळणार अशी चिंता लोकमतला बोलताना व्यक्त केली आहे.
बँकेतच आली छातीत कळ
सेंट्रल पार्क शाखा बंद झाल्याचे कळल्यावर ग्राहकांनी येथे गर्दी केली. याठिकाणी खात्यात असलेली मोठ्या प्रमाणातील रक्कम आता काढता येणार नसल्याने ३ खातेधारकाना बँकेतच हृदयविकाराचा झटका आला. या तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी कांदिवली येथे राहणारे व्यापारी सचिन गुरव (२६) हेही मंगळवारी सकाळी पीएमसी बँकेच्या सेंट्रल पार्क शाखेत आले होते. त्यांच्या खात्यामध्ये २० लाख रुपये आहेत. बँक बंद झाल्याचा धसका त्यांनी घेतल्याने त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे.
माझा भाऊ अमेरिकेत असून प्रत्येक महिन्याला आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी २५ हजारांची रक्कम पाठवतो. आता ६ महिन्यात आम्हाला अवघे ६ हजार मिळणार असल्याने आमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा चालणार? आमचे पैसे काढण्यास नकार मात्र बँकेच्या कर्मचाºयांचा पगार सुरू हा कुठला न्याय?
- रहीम पिराणी, ग्राहक, पालघर