वृद्धाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:11 PM2019-05-30T23:11:36+5:302019-05-30T23:12:05+5:30
आरोपी ड्रायव्हर : १४ लाख रुपयांच्या रोख रकमेसह यूपीतून अटक
नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा येथील मोकळ्या जागेवर रघुराम श्रीनिवास ऐथल (७२) यांची हत्या केलेला मृतदेह १३ मे रोजी वालीव पोलिसांना सापडला होता. त्यांची हत्या त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या कार चालक राहुल यादव याने गळा दाबून केली होती व १५ लाख रु पये घेऊन पळून गेला होता. वालीव पोलिसांच्या टीमने आरोपी कार चालक राहुल रामणारायन यादव (२५) याला यूपीतून अटक करून १४ लाख रु पये जप्त केले आहे. पोलिसांनी राहुलला वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वयोवृद्ध रघुराम श्रीनिवास ऐथल हे मुंबईच्या मस्जिद बंदर येथील कंपनीमध्ये कामाला असून कंपनीच्या मालकांच्या रुपयांचे देवाणघेवाणाचे काम करत होते. याच कंपनीमध्ये राहुल यादव नावाचा कार चालक काम करत होता. १३ मे रोजी सकाळी मालकांनी रघुराम यांना १५ लाख रुपयांची रोख रक्कम दिली आणि बोरिवली येथील एका पार्टीला देण्यासाठी सांगितले होते. रघुराम यांनी कार चालक यादव याला आपल्यासोबत चालण्यास सांगितले. पण यादव याची नियत बिघडली आणि कंपनीच्या आजूबाजूलाच रघुराम यांचा गळा आवळून हत्या केली होती.
हत्या केलेला मृतदेह गाडीत ठेवून कार मालजीपाडा येथील मोकळ्या जागेवर ठेवून १५ लाख रुपये घेऊन यादव पसार झाला होता. याच गुन्ह्याचा तपास करणारे तपास अधिकारी व सहायक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या टीमने कार मालकाची आणि कार चालकाची माहिती तपासात मिळवली. कार मालकाने पोलिसांना सांगितले की, ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवसांपासून मॅनेजर गायब होता आणि तो त्याच दिवसांपासून सुट्टी घेऊन गावाला गेला आहे. या माहितीच्या आधारे वालीव पोलिसांनी यूपीच्या कॉन्सर गावातून आरोपी कार चालक राहुल रामणारायन यादव (२५) याला अटक करत घरात झाडाझडती केली असता लोखंडाच्या बॉक्समधून १४ लाख रुपये पोलिसांना सापडले.
नेमके काय आहे प्रकरण
१३ मे रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मालजीपाडा गावात राहणारे वसंत म्हात्रे यांनी वालीव पोलीस ठाण्याला तक्र ार दिली की, मालजीपाडा येथील मोकळ्या जमिनीवर कोणत्यातरी वयोवृद्धाचा मृतदेह आहे. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात वयोवृद्धाची हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मुंबई पोलिसांनी १४ मे रोजी याच वयोवृद्धाची मिसिंगची तक्रार दाखल करून तपास करत होती. पण याचदरम्यान वालीव पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मयत वृद्धाची माहिती आणि फोटो शेअर केला होता. यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागून हत्येचा गुन्हा उघडकीस आला होता. नवी मुंबईच्या कामोठे येथील सेक्टर नंबर २२ मध्ये राहणारे वयोवृद्ध रघुराम श्रीनिवास ऐथल (७२) यांचा हा हत्या झालेला मृतदेह असल्याची ओळख पटली होती.