कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसईत बार, वाइन शॉपवर पोलीस अन् उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 12:20 AM2021-01-25T00:20:09+5:302021-01-25T00:20:21+5:30
वसई तालुक्यात शहरी भागात सुमारे २००च्या घरात बार आहेत, याशिवाय १९ वाइन शॉप, २००च्या वर बीयरशॉप आणि देशी दारूची ४० दुकाने आहेत, तर ग्रामीण भागात ८ बार आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा : वसई तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वाइन शॉप आणि बारचालक कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी राज्य सरकारच्या, महानगरपालिकेच्या व जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमावलीचे पालन करत आहेत. दारू उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यांचे काटेकोरपणे या बाबीकडे लक्ष देऊन नियम पायदळी तुडवले जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. जे बारवाले नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.बार आणि वाइन शॉप मालकांना कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जाऊ नये, म्हणून नोटीसही देण्यात आल्याचे कळते.
वसई तालुक्यात शहरी भागात सुमारे २००च्या घरात बार आहेत, याशिवाय १९ वाइन शॉप, २००च्या वर बीयरशॉप आणि देशी दारूची ४० दुकाने आहेत, तर ग्रामीण भागात ८ बार आहे. देशी दारू व वाइन शॉपची दुकाने नसून २५ बीयर शॉप आहे. शहरात मात्र अनेक बीयर आणि वाइन शॉपच्या आवारात मद्यपान सुरू आहे. काही बीयर शॉपवाल्यांनी दुकानाच्या बाहेरच पार्टिशन टाकून दारू पिण्यासाठी ग्राहकांना सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र, वेळेच्या मर्यादा ठेवण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार ग्रामीण भागात परमिट आणि बार सकाळी साडेअकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत, वाइन शॉप सकाळी साडेदहा ते रात्री दहा, बीयर शॉप सकाळी साडेदहा ते रात्री दहा आणि देशी दारूची दुकाने सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत उघडी असतात. वसई-विरार मनपाच्या आयुक्तांनी १३ ऑक्टोबरला कोरोनाच्या काळात दिलेल्या नियमावलीनुसार शहरी भागात परमिट आणि बार सकाळी साडेअकरा ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत, वाइन शॉप सकाळी दहा ते रात्री साडेदहा, बीयर शॉप सकाळी दहा ते रात्री साडेदहा आणि देशी दारूची दुकाने सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत उघडी असतात.
जिल्हाधिकारी, आयुक्तांचे आदेशानुसार कोरोनाच्या महामारीमुळे बारचालकांना ५० टक्केच आसनव्यवस्था वापरण्यास सांगितलेली असून, त्यांना सेवासुविधा पुरवाव्या. कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. ग्राहकाचे सॅनिटायझर आणि शरीराचे तापमान चेक करणे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ठेवणे.