पोलीस आयुक्तालयाची घोषणा फक्त कागदावरच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:18 AM2019-12-22T00:18:27+5:302019-12-22T00:18:33+5:30
भाजप सरकारची घोषणा हवेत । महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष
नालासोपारा : सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यामधील वसई तालुक्यात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून गुन्हेगारांवर कायद्याचा धाक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आॅगस्ट महिन्यात भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तालयाच्या स्थापनेची घोषणा केली होती. मात्र निवडणुका झाल्यानंतर भाजपचे सरकार सत्तेवर न आल्याने ही घोषणा हवेत विरण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवीन महाविकास आघाडी सरकार याबाबत काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वसई परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी एक अप्पर पोलीस अधीक्षक आणि तीन उपविभागीय पोलीस अधिकारी देण्यात आले आहेत. मात्र वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यात तक्र ार घेऊन गेलेल्या लोकांना न्यायासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक वेळा पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे लोकांचा पोलिसांवरच विश्वास उडाला आहे. नालासोपारा शहरातील टाकी रोड, संतोष भवन, धानिवबाग, गाला नगर या पट्ट्यातील झोपडपट्टीमध्ये युपी, बिहारवरून आलेले अनेक तडिपार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे लोक राहत असल्याची चर्चा आहे. पण त्यांची कोणतीही माहिती पोलिसांकडे नाही. विरारमध्ये वाळू माफियांनी हैदोस घातला होता. अनेक तक्र ारी येत होत्या, पण पोलीस काही त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे शेवटी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना मैदानात उतरावे लागले आणि त्यांनी अडीच कोटींचा मुद्देमाल पकडला होता.
वसई-विरार शहर आणि मिरा-भार्इंदर शहरासाठी २६ पोलीस ठाण्यांचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या हालचालींना यंदाच्या आॅगस्ट महिन्याआधी जोर वाढला होता. १५ आॅगस्ट रोजी या आयुक्तालयाची अधिकृत घोषणादेखील शासनस्तरावरून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आयुक्तालयाच्या उभारणीला सुरुवात झालेली नाही. वसई-विरार शहराची वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता सध्या या परिसराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची नितांत गरज आहे. एकदा आयुक्तालयाची स्थापना झाल्यास पालघर पोलीस अधीक्षकांच्या कार्यकक्षेतून वसई-विरार परिसर विभक्त होऊन तो वसई-विरार, मिरा-भार्इंदर शहर पोलीस आयुक्तालयाशी जोडण्यात येईल. २६ पोलीस ठाण्यांच्या मर्यादित कार्य सीमेमुळे वसई-विरारमधील वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र सद्यस्थितीत या महत्त्वाकांक्षी आयुक्तालयाची अधिकृत घोषणा होऊन प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात न झाल्याने या प्रस्तावाला विलंबाचा सूर लागला आहे. आयुक्तालयाची निर्मिती झाल्यास वसई-विरारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल.
कसे असेल नवीन पोलीस आयुक्तालय?
मध्यंतरी नव्याने आकारास येणाºया स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला वसई-भार्इंदर पोलीस आयुक्तालय असे नाव देण्याचेही ठरले होते. सदरच्या आयुक्तालयास आयुक्त म्हणून प्रशांत बुरडे किंवा बिपीन सिंग लाभणार असल्याची जोरदार चर्चाही होती. मात्र आयुक्तालयाच्या उभारणीलाच विलंबाचा सूर लागला आहे.
वसई-विरार, मीरा-भार्इंदर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करताना २६ पोलीस ठाणी उभारण्याची संकल्पना आहे. नव्याने उभारण्यात येणाºया आयुक्तालयात १ आयुक्त, १ अप्पर आयुक्त, ५ उपायुक्त, १२ सहाय्यक पोलीस आयुक्त, ७२ पोलीस निरीक्षक, १०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २२३ पोलीस उपनिरीक्षक अशी नेमणूक होणार असून प्रत्येक सहाय्यक आयुक्तांच्या अखत्यारीत एक किंवा दोन,
पोलीस स्टेशन देण्याची योजना तयार करण्यात
येत आहे. ठाणे जिल्ह्यातून ९८७ पोलीस अधिकारी
तर पालघर जिल्ह्यातून ११४७ पोलीस अधिकारी नवीन आयुक्तालयात
वर्ग करण्यात येणार
आहेत.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबाबत आमच्या कार्यालयात काहीही माहिती नसून याबाबतची माहिती डीजी किंवा अॅडिशनल डीजी कार्यालयाशी संपर्क साधल्यावर मिळू शकेल. तिथेच जी काही माहिती हवी आहे ती मिळेल.
- निकेत कौशिक, आयजी, कोकण विभाग