विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई; १५ दिवसांत २,३८९ नागरिकांवर बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:54 PM2021-03-27T23:54:13+5:302021-03-27T23:54:47+5:30
चार लाखांहून अधिक दंड वसूल
नालासोपारा : वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने आखून दिलेल्या गाइडलाइन्स पाळण्याचे नागरिकांना आवाहन प्रशासन करीत आहे. मात्र, वसई-विरारमध्ये या आवाहनाचा काहीही असर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुख्य नाक्यांवर, रस्त्यांवर, चौकांमध्ये नागरिक या गाइडलाइन्स पायदळी तुडवत आहेत. या लोकांवर अंकुश लावण्यासाठी मनपाचे मार्शलसुद्धा नापास झाले आहेत. आता गर्दीच्या ठिकाणी विनामास्क बिनधास्तपणे फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे.
पोलिसांनी मागील पंधरा दिवसांपासून रस्त्याने पायी चालणारे, रिक्षा, दुचाकी, बस, कार आणि इतर वाहनांतून विनामास्क फिरणाऱ्या २ हजार ३८९ नागरिकांवर कारवाई करून ४ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढे अशीच सुरू राहणार असल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. वाढत्या कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन नको पाहिजे असेल तर मास्क लावला पाहिजे, असे सांगितले आहे. तरीही काही नागरिक विनामास्क फिरत असल्याचे दिसत आहे. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असून २०० रुपये दंड वसूल करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी सांगितले. तसेच विनामास्क नागरिकांनी घराबाहेर पडू नका, सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.