बेफिकीर वाहनचालकांवर पोलिसांची मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:52 PM2021-04-20T23:52:09+5:302021-04-20T23:52:23+5:30
१९ दिवसांत तब्बल १०,८४३ केसेस दाखल : ४१ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा दंड केला वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : वसई आणि विरार या दोन झोनमध्ये वाहतूक पोलिसांनी गेल्या १९ दिवसांत विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांविरुद्ध तसेच मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमान्वये वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या कालावधीत वाहतूक पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने १० हजार ८४३ केसेस करून ४१ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा दंड केला वसूल केला आहे.
विकेंड लॉकडाऊनच्या दोन आठवड्यात ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. यादरम्यान ९७ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने शुक्रवारी रात्री
८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी
७ वाजेपर्यंत विकेंड लॉकडाऊन घोषित केला होता. दरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आलेली आहे, पण विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. रिक्षात दोन प्रवाशांना मुभा देण्यात आलेली असताना काही रिक्षाचालक जास्त प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात
आली आहे.
विकेंड लॉकडाऊनच्या वेळी वसई, विरार, नालासोपारा शहरातील मुख्य नाक्यावर वेगवेगळी पथक नेमून विशेष मोहीम राबवून चालकांवर करडी नजर ठेवली आहे. या १९ दिवसांच्या कालावधीत ट्रिपल सीट, जादा प्रवासी वाहतूक, युनिफॉर्म नसणे, मोबाइल टॉकिंग, नो पार्किंग, सीट बेल्ट न लावणे अशा केसेस करण्यात
आल्या आहेत.
कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांव्यतिरिक्त फिरणाऱ्या वाहनचालकांवर केसेस करून दंड वसूल करण्यात आला आहे. विकेंड लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणारी ९७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यापुढेही बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची तीव्र मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
- विलास सुपे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस, वसई