जिल्ह्यात पोलीस निम्म्याने कमी!, पालघर पोलिसांना अतिरिक्त कामाचा ताण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 01:30 AM2020-01-28T01:30:20+5:302020-01-28T01:30:24+5:30

पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर २३ पोलीस ठाणी तयार करण्यात आली.

Police in district reduced by half! | जिल्ह्यात पोलीस निम्म्याने कमी!, पालघर पोलिसांना अतिरिक्त कामाचा ताण

जिल्ह्यात पोलीस निम्म्याने कमी!, पालघर पोलिसांना अतिरिक्त कामाचा ताण

Next

- मंगेश कराळे

नालासोपारा : पालघर जिल्ह्याच्या पोलीस दलात मागील दोन महिन्यांत पाच पोलिसांना हृदयविकाराचा झटका आला असून तीन पोलीस दगावले आहेत. तरुण पोलिसांचा अचानक मृत्यू झाल्याने सारे पोलीस दल हादरले आहे. कमी मनुष्यबळ आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे पोलिसांच्या प्रकृतीवरच परिणाम होऊ लागला आहे. पालघर जिल्ह्यात ५० टक्के पोलीस बळ कमी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर २३ पोलीस ठाणी तयार करण्यात आली. २०१४ रोजी जे मनुष्यबळ होते, तेवढचे मनुष्यबळ पोलीस दलात आजही आहे. मागील ६ वर्षात त्यात वाढ झालेली नाही. सध्या पालघर जिल्ह्यात १ पोलीस अधीक्षक, २ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ९ उपविभागीय पोलीस अधिकारी (उपअधीक्षक), २६ पोलीस निरीक्षक, ५३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १४० पोलीस उपनिरीक्षक आणि २ हजार ८५९ पोलीस कर्मचारी आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांचा समावेश आहे. मात्र वरील पदे ही केवळ कागदोपत्री मंजूर असून प्रत्यक्षात ८ उपअधीक्षक, २६ पोलीस निरीक्षक, ४४ साहाय्यक पोलीस निरीक्षक, १११ पोलीस उपनिरीक्षक तसेच २ हजार ७०६ पोलीस कर्मचारीच हजर असतात.

पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असला तरी वसई, नालासोपारा, विरार हा शहरी भाग असून येथील लोकसंख्या २५ ते ३० लाखांच्या घरात आहे. वसई-विरारमध्ये ७ पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्यात केवळ दीडशे ते दोनशे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. किती पोलीस बळ हवे यासाठी गृहखात्यामार्फत अभ्यास गट नेमण्यात आले होते. त्यांनी आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. एक लाख लोकसंख्येमागे किती पोलीस हवे त्याचे प्रमाण या अहवालात देण्यात आले आहे. जिल्हा विभाजन झाल्यानंतर अनेक पोलीस ठाणे शहर, ठाणे ग्रामीण तसेच इतर शाखांमध्ये विलीन झाले. तसेच अनेक पोलिसांची जिल्हा बदली झाली. मात्र त्यांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत.

वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ वसई-विरारमध्येच किमान पाच हजार पोलिसांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील पोलीस बळ हे ५० टक्क्यांनी कमी असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. वसईमधील वालीव आणि विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून ४ पोलीस ठाणी प्रस्तावित केलेली आहेत. या चार पोलीस ठाण्यांचा भार दोन पोलीस ठाणी उचलत आहेत.
मागील दोन महिन्यांपासून पालघर पोलीस दलातील एकामागोमाग एक पोलिसांना हृदयविकाराचा झटके येऊ लागले आहे. या दोन महिन्यात एकूण पाच पोलिसांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यात महामार्ग सुरक्षा पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव श्रीपती सूर्यवंशी, तलासरीमधील हेड कॉन्स्टेबल गावित तसेच सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप या तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक वाल्मिक अहिरे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे यांच्यावर उपचार सुरू आहेत. तरुण पोलिसांना असे हृदयविकाराचे झटके येऊ लागल्याने पोलीस दल हादरले आहे.

कामाचा ताण कमी करण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू - विजयकांत सागर
पालघर पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी वरिष्ठाकंडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. पोलिसांचे कामाचे तास कमी होत नाहीत. त्यामुळे किमान पोलिसांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नियमित पोलिसांसाठी ताणतणावमुक्त शिबिर, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा भरवत असतो. पोलिसांनी असलेला वेळ स्वत:साठी द्यावा आणि शारीरिक तंदुरूस्ती राखावी, असे आवाहन त्यांनी केले. विजयकांत सागर यांनी पोलीस दल तंदुरुस्त राहावे यासाठी स्वत:च्या कृतीतून संदेश दिला आहे. त्यांनी मागील वर्षभरात वसई, पालघर, मुंबई आणि ठाण्यातील तब्बल १९ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे यंदाच्या वसई महापौर मॅरेथॉनमध्ये ४२ पोलिसांनी भाग घेतला होता.

कमी मनुष्यबळ असल्याने कामावर परिणाम : मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक आदी संवेदनशील शाखेत किमान ५० पोलीस बळ असणे आवश्यक असले तरी या शाखेत केवळ ७ ते ८ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित काम करता येत नसल्याची खंत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केली असून पोलीस बळ कमी असल्याचा परिणाम कामावर होत असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या वाढत असून त्याची उकल होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

वरिष्ठ अधिकाºयांनी आढावा घ्यावा : २३ पोलीस ठाण्यांपैकी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कमी गुन्हे आहेत, पण स्टाफ जास्त असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जास्त गुन्हे घडत असलेल्या पोलीस ठाण्यात दिले तर थोड्या फार प्रमाणात ताण कमी होण्यास मदत होईल, असे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत आढावा घेऊन योग्य तो विचार केल्यास जोपर्यंत अतिरिक्त पोलीस बळ मिळत नाही तोपर्यंत याचा जास्त गुन्हे घडणाºया पोलीस ठाण्याला उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

आयुक्तालयाची आशा निधीअभावी धूसर?
वसई विरारसह मीरा भार्इंदर शहर मिळून पोलीस आयुक्तालयाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र निधीअभावी आयुक्तालय अस्तित्वात आलेले नाही. सध्या त्यांची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. भाजप सत्तेत असताना त्यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयांना किंवा घोषणांना महाविकास आघाडी बगल देत आहे. त्यामुळे आयुक्तालयाची घोषणा भाजपने केली होती म्हणून त्याची आशा धूसर असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अतिरिक्त पोलीस बळ मिळणार नसल्याने पोलिसांची अधिक कसोटी लागणार आहे.

Web Title: Police in district reduced by half!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर