बोईसरच्या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना पोलिसांनी हटविले

By admin | Published: February 3, 2016 02:03 AM2016-02-03T02:03:10+5:302016-02-03T02:03:10+5:30

बोईसर-तारापूर व बोईसर-पालघर या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरिवाल्यांना हटविण्याची मोहिम बोईसर पोलिसांनी आज हाती घेतली

Police fired the hawkers on Boiser's main road | बोईसरच्या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना पोलिसांनी हटविले

बोईसरच्या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना पोलिसांनी हटविले

Next

पंकज राऊत,  बोईसर
बोईसर-तारापूर व बोईसर-पालघर या मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरिवाल्यांना हटविण्याची मोहिम बोईसर पोलिसांनी आज हाती घेतली. त्यामुळे सुमारे पन्नास फेरीवाल्यांनी बोईसर पोलीस स्थानकात धाव घेऊन कारवाई थांबविण्याची विनंती केली मात्र सदर कारवाई सुरुच ठेवणार असल्याचे बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक के.एस्.हेगाजे यांनी सांगितले.
बोईसर रेल्वे स्थानका जवळील मुख्य रस्त्यावरील डॉ. वर्तकांच्या घराच्या बाजूला पूर्वी पासून स्थानिक गोर-गरीब महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करुन गुजराण करीत आहेत मात्र अलीकडच्या काळात त्यात कटलरी, कपडे, चप्पल,बॅगा, फळे खाद्यपदार्थ इत्यादी विविध प्रकारच्या फेरीवाल्यांची जंत्री वाढतच जाऊन ते थेट विजयनगर सिडकोपर्यंत पोहोचले. त्या मध्ये काहींनी तर मोठीच जागा व्यापून मोठी दुकानेच थाटलीत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन त्याचा त्रास बोईसर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना होत आहे. काही दिवसापूर्वी एका अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमुळेच अडकली होती.
राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने व अतिसंवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्र व भाभा अणुसंशोधन केंद्र या दोन्ही अतिशय महत्वाच्या प्रकल्पांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून फेरीवाल्यांबरोबरच, खरेदीदार, रस्त्यावर पार्कींग करण्यांत येणाऱ्या मोटारसायकली व कार तसेच रिक्षांमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक खोळंबते आहे. या संदर्भातील नागरीकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे बोईसर पोलिसांनी फेरीवाला हटाव मोहिम हाती घेतली होती. हटविण्यांत आलेल्या फेरीवाल्यांना घेऊन जि. प. सदस्य रजना संखे पोलीस स्थानकांत जाऊन फेरीवाल्या संदर्भात निश्चित निर्णय होईपर्यंत कारवाई न करण्याची विनंती पोलिसांना केली त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भावेश मोरे ही उपस्थित होते.
फेरीवाल्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन त्याचा सर्व साधारण नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे फेरीवाले हटवा ही मोहीम सुरुच राहणार असून ग्रामपंचायतीने मुख्य रस्त्या व्यतीरिक्त फेरीवाल्यांना पर्यायी जागा द्यावी.
- के. एस. हेगाजे, पोलीस निरीक्षक
लवकरच ग्रामपंचायत, पोलीस, सर्वपक्षीय नेते, लोक प्रतिनिधी सामाजिक संघटना व नागरीक यांची संयुक्तपणे बैठक घेऊन फेरीवाल्या संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यांत येईल.
- निलम संखे, उपसरपंच

Web Title: Police fired the hawkers on Boiser's main road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.